
टुडे पान दोन मेन-धोकादायक झाडे, इमारती हटवा
धोकादायक झाडे, इमारती हटवा
मालवण प्रशासन ः संबंधित मालकांना पत्रकाद्वारे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ ः पावसाळ्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरातील जुने, मोडकळीस आलेली, भग्नावस्थेत असलेली व कोसळण्याचा संभव असलेली झाडे व घरे, इमारती संबंधित मालकांनी सुरक्षितरित्या पाडावीत, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या आदेशानुसार पालिकेच्या स्थापत्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या, भग्नावस्थेत असणाऱ्या किंवा कोसळण्याचा संभव असणाऱ्या वृक्षांपासून पावसाळ्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित वृक्षांचे मालक, भोगवटादार यांनी ही झाडे तत्काळ स्वखर्चाने काढून घ्यावीत. तसेच तोडलेल्या झाडाच्या जातीचे (अथवा योग्य स्थानिक जातीचे) तोडलेल्या झाडांच्या संख्येइतक्या झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. वृक्ष तोडतेवेळी तयार झालेला पालापाचोळा व इतर शेष-अवशेषांचा विहित मार्गाने पुनर्वापर अथवा इतर विहित प्रकार विल्हेवाट लावावी. वृक्ष तोडतेवेळी त्याबरोबर कोणत्याही प्रकारचा रस्ता, बांधकाम, वीज, दूरध्वनी व तत्सम वाहिनी, जल वाहिनी, मलनिःसारण वाहिनी इत्यादी तात्पुरते बंद करणे अथवा स्थलांतरित करणे आवश्यक असल्यास त्याबाबत संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या, भग्नावस्थेत असणाऱ्या किंवा कोसळण्याचा संभाव असणाऱ्या इमारतीपासून अथवा इमारतीच्या कोणत्याही भागापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित इमारतींचे मालक, भोगवटादार यांना पालिकेकडील अनुद्यापित स्ट्रक्चरल अभियंता यांच्याकडून संबंधित धोकादायक इमारतींचे स्थैरत्व तपासणी करून बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र घेणे, इमारतीच्या रचनात्मक स्थैर्याच्या दृष्टीने संबंधित इमारतीची स्ट्रक्चरल अभियंत्यांनी प्रस्तावित केलेली दुरुस्ती योग्य व सुरक्षित असल्यास इमारत दुरुस्तीबाबत अनुद्यापित स्ट्रक्चरल अभियंता यांच्यामार्फत या कार्यालयाची परवानगी घेऊन दुरुस्ती करणे, संबंधित इमारत रचनात्मक स्थैर्याच्या दृष्टीने दुरुस्ती योग्य नसल्यास संबंधित इमारत, या कार्यालयाच्या पूर्वपरवानगीने व तज्ज्ञ अनुद्यापित स्ट्रक्चरल अभियंत्यांच्या देखरेखेखाली परिसरातील इतर इमारतींना, नागरिकांना, रहदारीस कोणत्याही प्रकारची अडथळा, इजा, बाधा, जीवित किंवा वित्तहानी होऊ न देता सुरक्षितरित्या पाडावी, असे आवाहन स्थापत्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75875 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..