
देवगड शहरात गुरे ‘मोकाट’
35026
जामसंडे ः देवगड-नांदगाव रस्त्यावर मोकाट गुरांचा कळप फिरत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगड शहरात गुरे ‘मोकाट’
नागरिक हैराण; कळपातून मार्ग काढताना कसरत, बंदोबस्ताची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः येथील देवगड जामसंडे शहरातील मोकाट गुरांचे ग्रहण अद्याप सुटलेले दिसत नाही. मुख्य रस्त्यावर गुरांचा कळप फिरत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करीत वाहने हाकावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळा असूनही गुरांची राखण होत नसल्याने अशा गुरे मालकांवर नगरपंचायत प्रशासन आता कोणती कारवाई करणार? असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत.
येथील शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. रस्त्यावर दिवसा तसेच रात्रीही गुरे फिरत असल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिक हैराण आहेत. देवगड-नांदगाव मुख्य रस्त्यावर शहराच्या विविध भागात गुरे फिरत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काहीवेळा गुरांच्या कळपामधून वाट काढताना वाहन चालकांना आपली वाहने विरुद्ध दिशेने घ्यावी लागतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी न झाल्यास मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काहीवेळा गर्दीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर गुरे बसून असतात. अशावेळी रात्रीच्यावेळी समोरच्या वाहनाच्या प्रकाशझोतात रस्त्यावरील गुरे न दिसल्यास अपघात घडतात. यापूर्वी असे अपघात होऊन वाहन चालक जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत आहे; मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. सध्या खरिपाच्या शेतीचा काळ असल्याने ठिकठिकाणी भातशेतीची कामे सुरू आहेत. अशावेळी शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गुरांची राखण होणे आवश्यक असते; मात्र असे असूनही शहरात मोकाट जनावरे फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मोकाट गुरांमुळे भातशेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. तसेच, मुख्य रस्त्यावर गुरे फिरत असल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन लक्ष देईल का? अशी विचारणा आता होऊ लागली आहे.
...............
चौकट
कोंडवाड्याची गरज
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची घंटागाडी शहरात फिरत असताना गुरे मोकाट सोडू नये, असे आवाहन होत असते; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सद्यचित्र आहे. त्यामुळे संबधितांविरुद्ध कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. नगरपंचायतीकडून कोंडवाड्याची उपलब्धता हवी, अशी मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76012 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..