पुतळा स्थलांतरप्रश्‍नी न्यायालयात जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुतळा स्थलांतरप्रश्‍नी न्यायालयात जाणार
पुतळा स्थलांतरप्रश्‍नी न्यायालयात जाणार

पुतळा स्थलांतरप्रश्‍नी न्यायालयात जाणार

sakal_logo
By

35027
कणकवली ः पत्रकार परिषदेत बोलताना संदेश पारकर. सोबत अतुल रावराणे, राजू राठोड, सुजित जाधव आदी.


पुतळा स्थलांतरप्रश्‍नी न्यायालयात जाणार

संदेश पारकर ः सहभागी अधिकाऱ्यांना किंमत मोजावीच लागेल

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात स्थलांतरीत करण्यात आला. या बेकायदेशीर कृत्यात नगरपंचायत प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूलचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग आहे. या प्रकाराची माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविली असून, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर लढाई करू. यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना याची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून दिला. हे रयतेचे नव्हे, तर लुटारूंचे राज्य आहे. शहरातील खासगी मालमत्तेवरही असे प्रकार झाले आहेत, असे श्री. पारकर यांनी यावेळी सांगितले.
येथील विजय भवन आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवा सेना पदाधिकारी राजू राठोड, राजू राणे, दामू सावंत आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, "महामार्गाच्या चौपदरीकरणात जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरीत करून स्मारक जिल्हा परिषदेच्या शासकीय जागेत व्हावे, अशी शिवसेनेची पहिल्यापासून मागणी होती. त्याठिकाणी शिल्लक असणाऱ्या १८ गुंठे जागेवर महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा, असे आमचे म्हणणे होते; मात्र पुतळा रातोरात हलविणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडला आहे. हे बेकायदेशीर कृत्य करण्याची मान्यता त्यांना कुणी दिली? हिंमत होती तर पुतळा दिवसाढवळ्या का नाही हलविला? अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ''आम्हाला माहीत नाही'' असे उत्तर दिले; पण महामार्ग ठेकेदाराने अधिकाऱ्यांना व आमदार नीतेश राणेंना पुतळा हलविण्याची सुपारी दिली. अधिकाऱ्यांना याची किंमत मोजावीच लागेल. शासकीय जागेत शिवरायांचे अधिकृत स्मारक होत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही."
ते पुढे म्हणाले, "कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून ''रात्रीस खेळ चाले'' सुर आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वीपासून असलेल्या पुतळ्यापासून नजीकच्या अंतरावर नवा पुतळा रात्रीच्या सुमारास बसविला गेला, तर पूर्वीचा पुतळा हलविण्याची कार्यवाही सुध्दा रात्रीच केली गेली. यापूर्वी शहरात इमारत पाडण्याचे प्रकार नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून घडले. आता सार्वजनिक ''प्रॉपर्टी''बाबतही तसेच घडत आहेत. यापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी शिवरायांचा पुतळा गटारावर बसविण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुदैवाने मी तेथे वेळोवर पोहोचून विरोध केला होता. त्यानंतर नवा पुतळा बसविला गेला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या संगनमताने पुतळा बसवला गेला. तेथे दाखल झालेले कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे यांनी पुतळा विरोध केला; मात्र त्यांना बदली करण्याची धमकी दिली गेली. तो पुतळा हलविण्यासाठी लागलेला खर्च, मनुष्यबळ व हे कृत्य करण्यामागचे कारण काय, याची माहिती मी माहिती अधिकारात मागविली असून, पुतळा हलविल्याबाबत उच्च न्यायालयातही जाणार आहे. पुतळा हलविणाऱ्या सर्वांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. पुतळा हलविणे सोनेरी नव्हे, तर जिल्ह्यासाठी काळा दिवस आहे. नीतेश राणे हे राज्यात रयतेचे राज्य आल्याचे सांगत आहेत; पण दीपक केसरकर, उदय सामंत हे यापूर्वीच्या सत्तेतही होते. मग रयतेचे राज्य कसे? मुळात भाजपचे राजकारणच गद्दारीचे आहे. वास्तविक राणेच्या पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे, मग त्यांनी शिवाजी महाराज स्मारकासाठी जिल्हा परिषदेची शासकीय जागा का नाही उपलब्ध करून दिली?"
----
...तर हा भ्याडपणा
श्री. रावराणे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतरण वाजतगाजत व्हायला हवे होते; पण नीतेश राणे नेहमीच स्टंट करतात व त्यालाच ‘गनिमीकावा’, असे म्हणतात. हा भ्याडपणा आहे. सर्व जनतेला घेऊन स्थलांतर केले असते, तर त्याला नक्कीच मान्यता मिळाली असती. युगपुरुषांची अवहेलना केल्यास लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई होण्याची घटनेत तरतूद आहे. याबाबत श्री. पारकर न्यायालयीन लढाई लढणार असून, त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे. सध्या असलेल्या पूर्वीच्या पुतळ्याची जबाबदारी कोण घेणार, याचे उत्तर जिल्हाधिकारी, प्रशासनाने द्यायला हवे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76087 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top