रत्नागिरी-उपरे आणि बाडगा दोन्हीही सिंधुदुर्गातीलच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-उपरे आणि बाडगा दोन्हीही सिंधुदुर्गातीलच
रत्नागिरी-उपरे आणि बाडगा दोन्हीही सिंधुदुर्गातीलच

रत्नागिरी-उपरे आणि बाडगा दोन्हीही सिंधुदुर्गातीलच

sakal_logo
By

-rat10p48.jpg-
35104
रत्नागिरी ः शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत.

उपरा आणि बाडगा
दोन्हीही सिंधुदुर्गातीलच
---
विनायक राऊतांची टीका; उदय सामंतांनी ‘मातोश्री’च्या अन्नाची किमत ठेवली नाही
रत्नागिरी, ता. १० ः ‘एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. गेलेले बाडगे लोक आता आम्ही सेनेचे असे सांगायला लागले आहेत. उपरा आणि बाडगा हे दोन्हीही सिंधुदुर्गातीलच आहेत. रत्नागिरीतून निवडून गेलेले उदय सामंत म्हणतात, मला शिवसेनेला वाचवायचंय. जे आठ वर्षांचे आहेत, ज्यांना अक्कलदाढ आली नाही, ते सांगताहेत शिवसेना वाचवायचीय’, अशा शब्दांत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका करतानाच यापुढे कोणत्याही गद्दाराला सेनेत प्रवेश नाही, असे जाहीर केले.
शहराजवळील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे नेते माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजू महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बंडखोर शिवसेनेच्या आमदारांना लक्ष्य करीत ते म्हणाले, की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत, आम्ही शिवसैनिक. आपलेपणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. ‘मातोश्री’वर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातले. ‘म्हाडा’चे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्याबरोबर फिरले. ‘मातोश्री’च्या अन्नाचीही किंमत का नाही ठेवली? रत्नागिरीच्या इतिहासाला काळिमा फासणारी राजकीय माणसे निर्माण व्हावीत, हे दुर्दैव आहे. त्यांची स्थिती एकाच्या घरी नांदायचे, दुसऱ्‍याचे मंगळसूत्र घालायचे आणि तिसऱ्‍याचा गर्भ धारण करायचा, अशी आहे. ज्या सेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच सेनेला संपवायची भाषा हे करीत आहेत. सेनेला संपविणे म्हणजे महाराष्ट्राला संपविणे. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि चालते व्हा. सेनेचे धनुष्य पळवणारी औलाद अजूनही जन्माला आलेली नाही. सेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंना आधाराची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायचे वक्तव्य करीत आहेत? पापाचे वाटेकरी उदय सामंत झाले, हे आमचे दुर्दैव आहे.
---
चौकट
आमदारकी गेली तरी चिंता नाही ः साळवी
रत्नागिरी तालुका, जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला आहे. तेथे सेना रुजली आहे. युती तुटली, तो धक्का होता. उदय सामंत २०१४ मध्ये सेनेत आले. सेनेचा मुख्यमंत्री होणार, हे डोक्यात ठेवूनच सेनेचा म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते ‘म्हाडा’ अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. या वेळी माझ्यावर अन्याय झाला; पण निष्ठा शिवसेनेशी आहे. गेल्या २० दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या; पण मी सेनेशी प्रामाणिक आहे. ८ जुलैला विधानसभेत झालेल्या निवडीप्रसंगी व्हीपच्या विरोधात मतदान केल्याने भरत गोगावले यांच्या पत्रानुसार सचिवांनी तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिली आहे. याची आम्हाला परवा नाही. आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76101 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..