मालवणात मुख्याधिकारी धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात मुख्याधिकारी धारेवर
मालवणात मुख्याधिकारी धारेवर

मालवणात मुख्याधिकारी धारेवर

sakal_logo
By

35305
मालवण ः शहरातील विविध समस्यांप्रश्नी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना जाब विचारताना निलेश राणे.

मालवणात मुख्याधिकारी धारेवर

निलेश राणे आक्रमक; शहरातील समस्यांचा वाचला पाढा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : शहरातील सदोष गटार खोदाई, कचऱ्याचा प्रश्न, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांकडे दुर्लक्ष, रस्ता डांबरीकरणातील त्रुटी यांसह मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेवरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्याधिकारी देऊ शकले नाहीत. मुख्याधिकारी शिवसेनेचे सीईओ असल्याप्रमाणे वागत असून आमदार वैभव नाईक यांच्या किती आहारी जाणार ? असा प्रश्न करून आता राज्यात भाजपचे सरकार आले आहे, पाच वर्षातील भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागणार, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. मुख्याधिकाऱ्यांची शासनाच्या दक्षता विभागाकडे तक्रार करणार असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आज शहराच्या विविध समस्यांबाबत पालिकेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यावर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. तुम्ही शासनाचे मुख्याधिकारी आहात की शिवसेनेचे ? असा प्रश्न करत आमदाराच्या किती आहारी जाणार ? शहराचे तुम्ही वाटोळे करून टाकले असून आता राज्यात आमचे सरकार आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे टोक दाखवू का ? पालिकेमार्फत ठराविक नगरसेवकांच्या मतदार संघात गटारांची साफसफाई केली जाते. विविध विकास कामे केली जातात; पण भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, याबाबत राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी माजी सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे यांनी शहराच्या प्रश्नावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ललित चव्हाण, राजू बिडये, प्रमोद करलकर, जगदीश गावकर, विलास मुणगेकर, आबा हडकर आदी उपस्थित होते.
--
चोख पोलिस बंदोबस्त
निलेश राणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा धागा पकडून राणे यांनी मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कितीही पोलिस फोर्स आणा, शहराच्या प्रश्नांवर हयगय केल्यास सोडणार नाही, आमची सत्ता नव्हती तेव्हा गप्प बसलो नाही. आता तर आमची सत्ता आहे. भ्रष्टाचार करुन गप्प राहायला आता राज्यात ठाकरे सरकार नाही. शिंदे-भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत राणे यांनी ठणकावले.
----------
...म्हणून आमसभेस
टाळाटाळ ः राणे

आमदार वैभव नाईकांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ ः वैभव नाईक गेली सात वर्षे आमदार आहेत; मात्र या सात वर्षात २०१५ आणि २०१७ मध्येच आमसभा घेण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले. आज ग्रामीण भागात आमदारांविषयी नाराजी आहे. भविष्यात कोणीही आमदार चालेल, पण हा नको, अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आमसभा घेतली तर लोक तुटून पडेल, या भीतीपोटी आमसभा घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. मालवण पालिका भ्रष्टाचाराची ‘युनिव्हर्सिटी’ बनल्याचा आरोपही त्यांनी केला.
येथील भाजपा कार्यालयात श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "येथील पालिकेत मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदारांनी मिळून शहरावर डाका टाकण्याचे काम केले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हा सर्व भ्रष्टाचार सुरू होता. शहराची अवस्था आज बिकट बनली असून, गटारे स्वच्छ नाहीत, फायर ब्रिगेडसाठी जी गाडी आणली आहे, ती शहरातील चिंचोळ्या भागात जाऊ शकत नाही. कामगारांचे पगार देऊ शकत नाहीत; पण घर भरायला यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. स्वतःच्या बापाचा माल असल्याप्रमाणे पालिकेचा पैसा उधळला जात आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76319 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..