
निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्याची ग्रामपंचायत दप्तरात ढवळाढवळ
निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्याची
ग्रामपंचायत दप्तरात ढवळाढवळ
मळगावात आरोप; वरिष्ठांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासकीय दप्तरात ढवळाढवळ करण्याचा प्रकार मळगाव ग्रामपंचायतीत आठ दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ आना गावकर यांनी केला. हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचारावर पडदा घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास गप्प बसणार नाही, असा इशाराही गावकर यांनी दिला.
गावकर यांच्या म्हणण्यानुसार, मळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी वयोमानानुसार ३० जूनला निवृत्त झाले. असे असूनही ते गेले काही दिवस मळगाव ग्रामपंचायतीत उपस्थित राहून अधिकार नसतानाही ग्रामपंचायतीचे दप्तर स्वतः हाताळत आहेत. मुळात शिवसेनेच्या गटाकडून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत चौदाव्या वित्त आयोग निधी व ग्रामनिधीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी आवाज उठवून उपोषणही छेडले होते. ग्रामविकास मंत्र्यांपर्यंचेही भ्रष्टाचाराबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर तब्बल २७ मुद्यांचा खुलासा शासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून मागितला होता. हे प्रकरण ताजे असतानाच ते निवृत्त झाले; मात्र सद्यस्थितीत ते ग्रामपंचायतीत बसून दप्तराच्या कामांमध्ये ढवळाढवळ करीत असून, भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप गावकर यांनी केला. नवीन रजिस्टरवर लिखाण करून जुने रजिस्टर नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठांनी यात लक्ष घालून हा प्रकार थांबवावा, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
...............
कोट
निवृत्त अधिकाऱ्यांकडून काही नोंदी राहिल्या असल्यास त्या पूर्ण करण्याचा अधिकार संबधितांना आहे; मात्र इतके दिवस दप्तर हाताळणे चुकीचे असून, या प्रकरणात लक्ष घालणार आहे.
- वासुदेव नाईक, गटविकास अधिकारी, सावंतवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76498 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..