कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही
कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही

कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही

sakal_logo
By

35558
सावंतवाडी ः बैठकीत बोलताना आमदार दीपक केसरकर. शेजारी प्रशांत पानवेकर, रोहिणी सोळंके आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही

दीपक केसरकरांचा इशारा; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सावंतवाडी तहसीलमध्ये आढावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून काही ठिकाणी रस्ते तसेच साकव वाहून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांचा आढावा घेतला. यात त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. कामाचा वेग वाढवा. माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ नका. कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही, असा सज्जड दम उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आमदार केसरकर हे तब्बल एक महिन्यानंतर आज आपल्या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी येथील तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानी आणि विविध कामाचा आढावा घेतला. या बैठकीला सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तीन तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी प्रत्येक तालुक्यात कशा प्रकारे हानी झाली. त्याची माहीती घेत यात प्रामुख्याने अनेक गावातील रस्ते वाहून गेल्याचे तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वित्तहानी झाली असली तरी कुठेही मनुष्यहानी झाली नसल्याचे सांगितले. काही ठिकाणी कॉजवे वाहून गेले आहेत, असे स्पष्ट केले. यावर केसरकर यांनी याची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते पावसाळी डांबर टाकून लवकरात लवकर बुजवा, अशा सूचना बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता अमित कल्याणकर यांना तर केसरकारांनी चांगलेच धारेवर धरले. जर हे खड्डे पुढील चार दिवसात बुजवण्यात आले नाहीत तर तुम्हाला महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात जावे लागेल, हे मला सांगता येणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. काही अधिकारी काम न करता माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतात. त्यांना मी आताच सांगतो की त्यांनी माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जिल्ह्याचे नुकसान करू नये. मी आता शांत बसणार नाही. तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त काम करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पावसात काही गावातील मुलांची गैरसोय होत आहे. वेळेत एसटी पोहोचत नाहीत, अशा तक्रारी असून अस कुठेही होऊ नये, याची दक्षता एसटीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच सावंतवाडी एसटी बस स्थानकात जे खड्डे पडलेत ते खड्डेही तातडीने बुजवा. हवे तर मी वैयक्तिक पैसे देतो, असे केसरकरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विजेच्या प्रश्नांवर बोलतांना आवश्यक तिथे पोल टाका. तसा आराखडा तयार करा. मी आमदार निधी देतो. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारी नको. आंबोलीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय चालतो. तेथे नवखा वायरमन दिला, तो तत्काळ बदलून अनुभवी वायरमन द्या, असे सांगितले.
शहरातील मोती तलावातील गाळ काढताना ज्या सूचना केल्या होत्या त्याचे पालन न केल्याने आज कठडा कोसळण्याचा प्रकार घडला. मात्र, आता हे काम बांधकाम आणि पालिकेने लक्ष घालून तत्काळ मार्गी लावावे. त्यासाठी आवश्यक निधी देऊ. तलावाच्या दोन्ही गेटमध्ये चिखल साचल्यामुळे काम होत नाही, या दोन्ही गेटचे काम करा. पावसाळा संपण्यापूर्वी ही कामे मार्गी लावा. शिवाय जिमखाना मैदान येथील कोसळत असलेल्या घळणीबाबत तत्काळ निर्णय घ्या. जर ठेकेदार वेळेत कामे करत नसतील तर बाहेरचे ठेकेदार बोलवा; मात्र, कामे वेळेत पूर्ण करा. दर महिन्याला ठेकेदारांची बैठक घ्या तसेच पाळणेकोंड धरण्याच्या नव्या जलवाहिनीचे काम महिन्याभरात मार्गी लावा, असे मुख्याधिकारी जयंत जावडेकरांना सांगितले. बांद्यातील पूरस्थिती आणि तेथील व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सावंतवाडी व बांदा पोलिसांनी समन्वय साधून काम करा. आवश्यक आपत्कालिन साहित्य तेथे पोहचवा, असे सांगितले. या बैठकीला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण, अनिल आवटी आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
केसरकरांकडून आर्थिक मदत
वेगुर्ले येथील बचत गटांच्या कापड दुकानाला लागलेली आग आणि झालेले नुकसान तर शिरशिंगे येथील वाहून गेलेल्या महिलेच्या कुटूबियांना आमदार केसरकर यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत वेगुर्ले व सावंतवाडी तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76650 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top