
केसरकरांच्या भूमिकेवर वेंगुर्लेत रोष
35594
वेंगुर्ले ः बैठकीत बोलताना तालुकाप्रमुख यशवंत परब. सोबत अजित राऊळ आदी.
केसरकरांच्या भूमिकेवर वेंगुर्लेत रोष
शिवसेनेची बैठक; आगामी निवडणुकांत विजयाचा निर्धार
वेंगुर्ले, ता. १२ ः वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची तालुका कार्यकारिणीची मासिक सभा आज शिवसेना तालुका कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी सद्यस्थितीत शिवसेना पक्षाची असलेली राजकीय परिस्थिती व घडामोडीतील शिवसेना आमदारांच्या बंडखोरीबाबत चर्चा करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्याने आमदार दीपक केसरकर यांना निवडणुकीत मताधिक्य दिले; मात्र हे सर्व विसरून कुठल्याही संघटनेच्या पदाधिकारी वा शिवसैनिकाचा विचार न करता ते शिंदे गटात सामील झाल्याबाबत शिवसैनिकांनी आजच्या सभेत रोष व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, उमेश नाईक, शीतल साळगावकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, संजय परब, संजय फर्नांडिस, गजानन गोलतकर, सुमन कामत, नीलेश चमणकर, अभिनव मांजरेकर, दादा सारंग, आनंद बटा, शिल्पा वस्त, स्नेहा साळगावकर, वंदना कांबळी, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रश्मी गावडे, सीमा गावडे, सावली आडारकर आदी उपस्थित होते. आमदार केसरकरांना वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही वेळा चांगले मताधिक्य देण्याचे काम केले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत साडेचार हजाराचे मताधिक्य मिळवून दिले. तिसऱ्या वेळीही त्यांना निवडून देत वेंगुर्ले तालुक्याने विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती; परंतु हे सर्व विसरून केसरकर संघटनेचा कुठलाही पदाधिकारी व शिवसैनिकाचा विचार न करता ते शिंदे गटात सामील झाले. याबाबत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
---
नुकसान भरपाईची मागणी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी निवडणुकीत शंभर टक्के यश प्राप्त करण्याचा निर्धार यावेळी झाला. ‘तौक्ते’वेळी झालेली सुमारे एक कोटी सत्तर लाखाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये मठ गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांनाही मदत दिली नसल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76702 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..