
संदेश पारकर सिंधुदुर्गचे फायरब्रँड नेतृत्व
पुरवणी डोके ः संदेश पारकर वाढदिवस विशेष
swt१३११.jpg
३५६६७
संदेश पारकर
swt१३२१.jpg
३५७००
कणकवली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताना संदेश पारकर.
swt१३२२.jpg
३५७०१
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा करताना संदेश पारकर.
swt१३२३.jpg
३५७०२
कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदेश पारकर यांचे अभिनंदन करताना तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.
swt१३२४.jpg
L३५७०३
कुटुंबवत्सल संदेश पारकर आपल्या पत्नी आणि मुलांसोबत
swt१३२५.jpg
३५७०४
ओसरगाव येथील टोलविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करताना संदेश पारकर
सिंधुदुर्गचे फायरब्रँड नेतृत्व
लीड
कणकवली सरपंच पदापासून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केलेल्या संदेश पारकर यांनी ''संघर्षनायक'' अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. कार्यकर्त्यावर कोणतेही संकट आले की हा माणूस पहाडासारखा उभा राहतो. लहानशी मूर्ती, अंगात कडक इस्त्री केलेला लीननचा शर्ट आणि काळी ट्राऊझर या वेषात कणकवली, देवगड आणि अवघा सिंधुदुर्ग जिल्हा फिरून मंत्रालयात भटकणारे आपल्या सिंधुदुर्गाचे फायरब्रँड नेतृत्व म्हणजे संदेश पारकर होय. त्यांचा गुरुवारी (ता.१४) वाढदिवस यानिमित्ताने...
- रघु जानवलीकर
-------
संदेश पारकर!सिर्फ नाम ही काफी है, असा सिनेमातील डायलॉग या व्यक्तीसाठी मारण्यात काही हरकत नाही. आता आमचा मुक्काम मुंबईत असल्या कारणामुळे या मित्राची प्रत्यक्ष भेट तशी अभावानेच होते. पण, फोनवर संपर्क कायम असतो. संदेश हा कणकवलीचा सरपंच असल्यापासून आम्हा दोघांची मैत्री. ही मैत्री जपण्याचे काम दोघांकडूनही इमानेइतबारे झाले आहे. सरपंच असताना संदेशचे नाव खरे तर फक्त कणकवली पुरते मर्यादित होते. मात्र, नंतर राजकारणातील त्यांच्या सहभागाची कक्षा विस्तारली आणि ''संघर्षनायक'' अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करत तो अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संदेश पारकर यांचा आज वाढदिवस. त्यामुळे त्याचा येथे कौतुक सोहळा साजरा होणे क्रमप्राप्तच आहे, पण कौतुकाचे हे रकाने भरताना कुठेही स्तुतीपाठक होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत.
संदेश पारकर राजकारणी म्हणून योग्य की मित्र म्हणून योग्य, हा जेव्हा-जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा तराजूतील दोन्ही मापे समसमान दिसतात. कुठेच माप एका बाजूला झुकत नाही. त्याच्या राजकारणी आणि मित्र या भूमिकेचा साकल्याने विचार करायचा झाल्यास त्याने राजकारणातली मैत्री जपली, पण मैत्रीत कधी राजकारण आणले नाही. जयंतीपासून ते मयंतीपर्यंत रात्री-अपरात्री धावून जाणारा संदेश आम्ही पाहिला आहे. श्रीधर नाईक यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापलेला संदेश आम्ही पाहिलेला आहे आणि राजकारणातील कुंडलीत जणू ''संघर्षा''चा ग्रह बसलेलाच असावा, या विचाराने विमनस्क झालेला संदेशही पाहिला आहे. त्याच्याबद्दलचे अनेक वाद-प्रवादही आम्ही ऐकले आहेत. मात्र, तरीही मैत्रीला जागणारा राजकारणी ही त्याची ओळख आम्हाला अधिक भावली.
राजकारण म्हणजे बेरकेपणा. काही राजकारण्यांच्या चेहऱ्यावर तो बेरकी भाव पाहताक्षणीच दिसतो. संदेश मात्र याला अपवाद आहे. लहानशी मूर्ती, अंगात कडक इस्त्री केलेला लीननचा शर्ट आणि काळी ट्राऊझर या वेषात कणकवली, देवगड आणि अवघा सिंधुदुर्ग जिल्हा फिरून मंत्रालयात भटकणारा संदेश म्हणजे ''कर्मवीर'' शोभावा असाच आहे. तसा तो सर्वच पक्षात फिरून आला आहे. ही त्याची चूक असेल कदाचित, पण त्यामुळे त्याचे कर्तृत्व झाकोळलेले नाही. उलटपक्षी ते अधिकाधिक उजळ होत गेले आहे. राजकारणात कधी मतभेद होतात, तर कधी मनभेद. त्यामुळे कधी-कधी नवा झेंडा खांद्यावर घ्यावा लागतो. संदेशच्या संघर्षमय राजकारणात असे प्रसंग आले, पण त्याने त्याची प्रामाणिकता सोडली नाही.
संदेश हा खरे तर सच्चा कार्यकर्ता आहे. रस्त्यावर उतरून लढणारा लढवय्या सैनिक आहे. कणकवली पोलीस ठाण्यातील भिडणे असो किंवा अण्णासाहेब पटवर्धन चौकातील रास्ता रोको असो, कणकवलीकरांनी संदेशमधील तोच लढवय्या कार्यकर्ता पाहिला आहे. आज त्याच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांचे जे मोहोळ आहे तो त्याचाच परिपाक आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. असे म्हणतात लढाई दोघांनाच कळते. एक लढाईपासून पळालेला आणि दुसरा लढाई हरलेला. आम्ही मात्र जेव्हा संदेशची आजपर्यंतची राजकीय वाटचाल पाहतो तेव्हा हे वाक्य आम्हाला अर्धसत्य वाटू लागते. कारण संदेश ना लढाईपासून पळालेला आहे ना त्याचा पराभव झाला आहे. तो अजूनही लढतोच आहे. काही निवडणूकांमध्ये त्याने पराभव पत्करला असेल, पण निवडणूकीमधील पराभव हा काही लढाईतील पराभव होत नाही. संदेश याची दुहेरी लढाई सुरू आहे. एक अन्यायाविरूद्ध, आपल्या कार्यकर्त्यांसाठी, जनसामान्यांसाठी रस्त्यावरील आणि दुसरी स्वत:ची स्वत:शीच.
संदेश याने पराभवाचे धक्के पचवले असले तरी त्याचा मास्टरस्ट्रोक ठरला तो देवगड नगरपंचायतीची निवडणूक. आता भाजपवासी असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांना पराभवाची धूळ चारून संदेशने सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. योग्य प्रचारयंत्रणा, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या बळावर संदेश याने देवगड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला. तेव्हा पक्षप्रमुखांनीही त्याचे मनापासून अभिनंदन केले. कारण हा वरवर शिवसेनेचा विजय वाटत असला तरी तो खऱ्या अर्थाने संदेश पारकर या व्यक्तीचा विजय होता. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा पराभव करता येतो हे संदेशने देवगड ताब्यात घेऊन दाखवून दिले होते. ''फ्लॉवर समजे क्या, फायर है मै'' असा संदेशचा खाक्या आहे. मात्र, विरोधकांचे तंबू उखडण्यासाठी ही ''फायर'' आता अधिकाधिक भडकवायला हवी. संदेश याला राज्यस्तरीय पद द्यायला हवे, याची काळजी शिवसेना पक्षाने घ्यायला हवी. तेवढे राजकीय गुण, राजकीय वकूब संदेशमध्ये आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे.
संदेश पारकर ही स्वत:च एक शक्ती आहे असे म्हटले तरी समोर बलाढ्य धनशक्ती उभी ठाणलेली असताना तिला नामोहरम करायचे कसे? हा प्रश्नच आहे. पक्षाने जर संदेशला सर्वतोपरी ताकद दिली तर केवळ सिंधुदुर्गातच नव्हे अख्ख्या कोकणात शिवसनेचा भगवा ताकदीने फडकेल आणि विरोधकांना घर गाठावे लागेल, असे आम्हाला वाटते.
संदेश याचा आज वाढदिवस. म्हणजे वयाचा विचार केला तर तो एक वर्षाने वाढला. वाढत्या वयासोबत माणूस हळूहळू बाल्यावस्थेकडे झुकू लागतो असे शास्त्र सांगते. संदेश या शास्त्राला अपवाद आहे. तो तारुण्याकडे झुकू लागला आहे. दिवसेंदिवस त्याच्यातील ऊर्जा अधिकच ओसंडून वाहू लागली आहे. संघर्ष अधिकच टोकदार होऊ लागला आहे. त्याच्या राजकीय कुंडलीत कुठला योग आहे ठाऊक नाही, पण आमच्या कुंडलीत त्याच्यासारखा मित्र लाभणे हे आमचे भाग्य म्हणावे. संदेश पारकर याला आम्ही गमतीने ''संकट पार कर'' असे म्हणतो. कार्यकर्त्यावर संकट आले की हा माणूस पहाडासारखा उभा राहतो. त्याच्या यशाचे हेच गमक असावे. असो. लिहिण्यासारखे खूप आहे. मात्र, एक गोष्ट आवर्जून नमूद करतो आणि थांबतो. आपल्या कोकणात कुणाला घरच्या कुंडीतील तुळस द्यायची असेल तर तिच्या मुळाला माती लावून दिली जाते. कारण एकच, ती माती तिची पाठराखण असते. संदेश याचे राजकीय भवितव्य उज्वल आहे. तो उद्या नक्कीच मोठा होईल. तो खूप उंच होईल तेव्हा कणकवली, सिंधुदुर्गला विसरणार नाही याची खात्री आहे. कारण त्याच्या पायाला इथली माती लागली आहे. ती मातीच त्याची पाठराखण करणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76838 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..