संदेश पारकर यांचे नेतृत्व ः विश्‍वासाचे, आपुलकीचे, जनसामान्यांचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदेश पारकर यांचे नेतृत्व ः विश्‍वासाचे, आपुलकीचे, जनसामान्यांचे!
संदेश पारकर यांचे नेतृत्व ः विश्‍वासाचे, आपुलकीचे, जनसामान्यांचे!

संदेश पारकर यांचे नेतृत्व ः विश्‍वासाचे, आपुलकीचे, जनसामान्यांचे!

sakal_logo
By

swt1320.jpg
35699
संदेश पारकर


नेतृत्वः विश्‍वासाचे, आपुलकीचे, जनसामान्यांचे!

लीड
संकट कुठलंही येऊ दे, मग ते कार्यकर्त्यावर असो अथवा सर्वसामान्यांवर. सर्व संकटांना भक्कमपणे, निधड्या छातीने सामोरा जाणारा कार्यकर्ता म्हणजे संदेश पारकर. तौक्ते वादळ, एसटी संपात भरडले गेले कामगार, नुकसानग्रस्त शेतकरी, वाढती महागाई, टोल वसुलीची टांगती तलवार आदी सर्वच आंदोलनाचं नेतृत्व संदेशभाईंनी केले आहे. अनेक प्रश्‍नांना वाचा फोडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात संदेशभाई नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. कार्यकर्ता आणि तळागाळातील नागरिक यांच्याशी विश्‍वासाचे आणि आपुलकीचे नाते जोडले गेलेल्या संदेशभाईंच्या कार्यकर्तृत्वाचा हा चढता आलेख...
--------------
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी लढणार्‍या संदेशभाईंना तरुण वयातच कणकवलीचे सरपंचपद भूषवता आले. नगरपंचायत झाल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कणकवलीकरांनी सर्वाधिक मतांची पसंती संदेश भाईंना दिली. त्यानंतर कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष अशी जबाबदारीही श्री. पारकर यांनी लीलया पेलली. किंबहुना संदेश भाईंच्या कार्यकर्तृत्वाचा आवाकाच एवढा मोठा होता की तत्कालीन या पदांवर नियुक्ती करताना संपूर्ण कोकणातून संदेश पारकर हेच नाव अग्रस्थानी होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्‍न त्यांनी हिरिरीने मांडले. त्यानंतर जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलने केली. कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात युवकांची संघटना उभी केली.
---------

कणकवली विकासाची पायाभरणी
जनसामान्यांसाठी संघर्ष करणार्‍या संदेश पारकर यांनी कणकवलीच्या सरपंच आणि नगराध्यक्षपदाच्या कालावधीत शहराच्या विकासाचीही पायाभरणी केली. कणकवली शहरातील सुसज्ज मच्छीमार्केट, अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट, इनडोअर गेमसाठी संकुल, सुसज्ज व्यायामशाळा, पर्यटन सुविधा केंद्र, गणपती साणा उभारणी, गडनदीपात्रात मराठा मंडळ लगत पाणी साठवणूक बंधारा, अद्ययावत पाणी पुरवठा व्यवस्था आदी अनेक कामांची उभारणी संदेश पारकर यांनी केली. शहरात साठणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया व्हावी यासाठी संदेश पारकर यांनीच आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मुडेश्‍वर मैदान परिसरात नगरपंचायतीला जागा उपलब्ध करून दिली होती. श्री. पारकर यांच्या दूरदृष्टीमुळेच आज कणकवली शहराची विकासाकडे वेगाने वाटचाल होताना दिसून येत आहे.
-------------

सिंचन प्रकल्पांना चालना
कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. पारकर यांनी सर्वप्रथम धरणग्रस्तांचे प्रश्‍न समजावून घेतले. तसेच प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त मोबदला, यांचे योग्य जागेत पुनर्वसन होण्यासाठीही पारकर यांनी आग्रही भूमिका मांडली. त्याबरोबर गेली अनेक वर्षे रखडलेल्या धरण प्रकल्पांनाही पारकर यांच्या काळात गती मिळाली. वैभववाडीतील आखवणे भोम, देवगड तालुक्यातील कोर्ले सातंडी, कणकवली तालुक्यातील तरंदळे लघु सिंचन प्रकल्प, नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प या कामांना मोठी गती मिळाली. याखेरीज कणकवली शहराची पाणी टंचाईतून मुक्तता व्हावी यासाठी श्री. पारकर यांनी कणकवली शहर हद्दीत वरचीवाडी, कनकनगर आणि मराठा मंडळ या तीन ठिकाणी केटी बंधारे मंजूर करून घेतले आणि या बंधार्‍यांचीही कामे पूर्ण झाली. त्यामुळे कणकवलीसह वागदे, हळवल, हरकुळ, कलमठ आदी गावांचीही पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे. जानवली नदीपात्रातही केटी बंधारा तसेच गणपती साणा येथे जानवली आणि कणकवली शहर यांना जोडणारा मोठा पूल मंजूर करून आणला होता.
--------------

कला, क्रीडासह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान
जनसेवेसाठी राजकारण आणि समाजकारण करणार्‍या संदेशभाईंमधील कलावंतही जपला. जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणचा सांस्कृतिक महोत्सव, सोहळा याचं उद्घाटन भाईंच्या हस्ते होणार असेल तर तेथे भाईंना गाण्यासाठी आवर्जून आग्रह केला जातो. आपल्यातील कलागुण जपणारे संदेश भाई कणकवली शहराच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासाठीही भरीव योगदान देत आहेत. कणकवलीसह जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू निर्माण व्हावेत, यासाठी संदेश पारकर यांनी गोवा, कर्नाटकसह राज्यभरातील नामांकित खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा तब्बल 25 वर्षे भरवली. याखेरीज देशपातळीवरच्या खेळाडूंचा सहभाग असलेली कबड्डी स्पर्धा देखील संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित केली जात आहे. स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी फुटबॉल, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन याबरोबर चित्रकला, कविता आदी स्पर्धांचेही आयोजन सातत्याने संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने केले जात आहे. सांस्कृतिक मंडळांनाही या मित्रमंडळाच्यावतीने सातत्याने सहकार्य आणि मदत केली जात आहे.
---------------

टोल माफीसाठी आग्रही भूमिका
महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वानंतर ओसरगाव येथील टोलनाका कार्यान्वित होणार आहे. मात्र, या टोलचा मोठा भुर्दंड सिंधुदुर्गवासीयांवर पडणार असल्याचे लक्षात येता संदेश पारकर यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांसह टोल विरोधात आग्रही भूमिका घेत ओसरगाव टोलनाक्यावर आंदोलन केले. सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी दिल्याखेरीज टोल सुरू करू देणार नाही, असा निर्धारही संदेश भाईंनी केला. त्यामुळे तूर्तास टोल वसुली थांबली आहे.
------------

कंत्राटी एसटी कामगारांना न्याय
एसटी कर्मचार्‍यांच्या संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनातर्फे खासगी माध्यमातून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली. संप मिटल्यावर या कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले. त्यामुळे संपकाळात जिवावर उदार होऊन काम करणारे हे बेरोजगार झाले. या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी संदेश पारकर यांनी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून या कामगारांना न्याय मिळवून दिला.
-----------

''तौक्ते''ग्रस्तांसाठी पाठपुरावा
तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. संदेश पारकर यांनी देवगड, वेंगुर्ले आणि मालवण तालुक्याचा संपूर्ण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला आणि शिवसेना नेतृत्वाच्या माध्यमातून या वादळग्रस्तांना मदतही मिळवून देण्यात मोठा हातभार लावला.
-----------

देवगड नगरपंचायत विजयाचे शिल्पकार
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यावर देवगड नगरपंचायतीची जबाबदारी देण्यात आली होती. ही नगरपंचायत भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या ताब्यात होती. मात्र, संदेशभाईंनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली या नगरपंचायतीवर शिवसेनेला विजय मिळवून दिला आणि या विजयाचे शिल्पकार ठरले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76839 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top