
चिपळूण ः एकसदस्यीय पद्धतीने होणार पालिका निवडणूक
निवडणूक चिन्ह वापरा
....
एकसदस्यीय पद्धतीने होणार पालिका निवडणूक
भाजप कार्यकर्त्यांना मिळाला संदेश; मोर्चेबांधणीकडे लक्ष
चिपळूण, ता. १३ ः महाविकास आघाडीतील तीन पक्षांना अनुकूल असलेली बहुसदस्यीय पद्धत रद्द करून भाजपला सोयीस्कर असलेल्या एकसदस्यीय पद्धतीने पालिका निवडणुका घेण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत आमदारांच्या बैठकीत दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजप सरकारच्या काळात एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्याने बड्या शहरातील महापालिका हातातून गेल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रवादीच्या आग्रहाखातर मागील महाविकास आघाडी सरकारने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांना फायदेशीर ठरणारी बहुसदस्यीय पद्धत लागू केली होती. कोरोना साथीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम तयारी सुरू केली असून काही ग्रामपंचायत, पालिका आणि नगरपंचायत निवडणुका ऑगस्टमध्ये जाहीर केल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टी होते. त्यामुळे येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. या पालिका क्षेत्रातील मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र एकसदस्यीय पद्धतीने पालिका निवडणुका घेण्याचे संकेत भाजप कार्यकर्त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागले आहेत. पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना झाली आहे. त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या प्रभागात निवडून येऊ शकतो, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76914 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..