
खेड ः तालुक्याला पावसाने झोडपले
फोटो ओळी
- rat13p36.jpg ः
३५८१९ खेड ः जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, देवणे बंदर येथे पुराचे पाणी आले होते.
- rat13p35.jpg ः
३५८१८ देवणे बंदर परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेली जनावरे.
--------------
जगबुडी, नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर
खेड तालुक्यात मुसळधार; दापोली, मंडणगडचा तुटला संपर्क
खेड, ता. १३ ः खेड तालुक्याला मंगळवार सायंकाळपासून पावसाने झोडपून काढल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. शहरातील व्यापारी आणि नागरिकांची झोप उडाली आहे. जगबुडी नदीच्या देवणे डोहानजीक पाच पाळीव जनावरे अडकली होती. एका बाजूला महाकाय मगरी आणि दुसऱ्या बाजूला खोल पाणी यामुळे अडकलेल्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे कठीण होऊन बसले होते. ४ गायी अन् एक वासरू यांना वाचवण्यात एनडीआरएफ जवानाना यश आले. जोराचा पाऊस आणि पूर यामुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीनच जनावरांना काढण्यात यश आले होते. खेड-दापोली मार्गावरील नारिंगीही धोक्याची पातळी ओलांडून वाहात असून, आजूबाजूच्या शेतीसह खेड दापोली हा रस्तादेखील कवेत घेतला आहे. त्यामुळे खेड तालुक्याचा खाडीपट्टा, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांशी असलेला संपर्क तुटला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मंगळवारी सायंकाळी पुन्हा धो धो पावसाने सुरवात केली आणि या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळतच होता. त्यामुळे जगबुडीच्या पाण्याची पातळी ७.७२ मीटर (जगबुडीची धोका पातळी ७ मीटर आहे.) होऊन नदीकिनारी मटण मच्छी मार्केट येथून पाणी शहराकडे घुसू लागले. व्यापाऱ्यांनी मंगळवारची रात्र जागून काढली. सोसाट्यांचा वारा आणि संततधारेमुळे ग्रामीण भागात वृक्ष उन्मळून पडले. सतत विद्युतपुरवठा खंडित होत आहे. महावितरणचे कर्मचारी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागात भात लावणीची पन्नास टक्के कामे उरकली आहेत, तर नातूवाडी, खोपी-पिंपळवाडी, शिरवली, शेल्डी, कोंडिवली या धरण क्षेत्रात चांगली पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे चांगला पाणीसाठा होत आहे. जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाणी पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत असल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.
---
चौकट
गावांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर वाढू लागताच जगबुडी नदीकिनारी वसलेल्या भोस्ते, अलसुरे, निळीक या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नारिंगी नदीच्या किनारी असलेल्या गावांनाही धोक्याच्या सूचना देण्यात आल्या. खेडच्या प्रांताधिकारी राजेश्री मोरे, खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलिस अधिकारी आणि एनडीआरएफचे जवान पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खेड नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील सज्ज आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, फायबर बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
चौकट
एसटीचे वेळापत्रक कोलमडले
संततधारेचा परिणाम एसटीच्या वेळापत्रकावरही झाला आहे. पावसामुळे ग्रामीण भागात गेलेल्या गाड्या उशिरा डेपोत येत होत्या. परिणामी ग्रामीण भागातून सकाळी बाजारात आलेले ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शहरातच अडकून पडले आहेत. पावसाचा जोर वाढताच शहरातील शाळा लवकर सोडण्यात आल्या, मात्र एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76997 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..