
घरात घुसून बिबट्याचा दोघांवर हल्ला
नागरी वस्तीत बिबट्याचा हल्ला
..........
घरात घुसून बिबट्याचा दोघांवर हल्ला
कुवेशीतील घटना ; ग्रामस्थांच्या आरडाओरड्याने ठोकली धूम, एकजण जखमी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ः तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदेवाडी येथे जुबेदा अन्वर खान या महिलेच्या घरामध्ये घुसून बिबट्याने तिच्यासह त्या ठिकाणी असलेले काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटे त्या ठिकाणी बिबट्या होता; मात्र, लोकांची गर्दी आणि गोंगाटानंतर बिबट्याने तेथून जंगलामध्ये धूम ठोकली. या प्रकाराने कुवेशी गावासह परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या हल्ल्यामध्ये जाधव यांना किरकोळ दुखापत झाली असून, ते सद्यःस्थितीमध्ये सुखरूप आहेत.
जुबेदा खान यांच्या घरामध्ये गुरुवारी (ता. १४) अचानक बिबट्या घुसला. घरामध्ये घुसल्यानंतर त्याने त्या वेळी घरामध्ये असलेल्या जुबेदा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून त्या ठिकाणी आलेल्या जाधव यांनी हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बिबट्याने जाधव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेची बोंबाबोंब झाल्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी एकच गलका केला अन् बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून, घरामध्ये घुसलेल्या बिबट्याने जंगलामध्ये धूम ठोकली.
कुवेशी गावातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असून अनेकवेळा बिबट्याचे लोकांना दर्शन होते. गावातील अनेक भटकी अन् पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून बिबट्याने त्यांचा फडशा पाडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सुमारे सहा महिन्यापूर्वी बिबट्याने कुवेशीतील एका ग्रामस्थाच्या गोठ्यामध्ये येऊन जनावरांवर हल्ला केला होता. त्यांनतर आता बिबट्या घरामध्ये घुसल्याचा प्रकार घडला आहे. शेतीच्या कामांसह अन्य विविध कामानिमित्ताने कुवेशी ग्रामस्थांचा जंगल परिसरामध्ये सातत्याने वावर असतो. त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी कुवेशी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज कुवेशी येथे भेट दिली आहे.
चौकट
मादीही जवळपास असण्याची शक्यता
कुवेशी येथे लोकवस्तीमध्ये घुसून हल्ला करणारा बिबट्या हा सुमारे चार-पाच महिन्यांचा असल्याचा अंदाज ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. यामध्ये त्याच्यासोबत मादीही असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77544 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..