
खात्री करुनच रहिवाशी दाखले द्या
36296
सावंतवाडी ः प्रभारी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी.
खात्री करुनच रहिवाशी दाखले द्या
रुपेश राऊळ ः नवोदय प्रवेशाबाबत सावंतवाडीत प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सांगेली येथील नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे रहिवाशी दाखले खातरजमा जमा केल्याशिवाय देऊ नका; अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह शिष्टमंडळाने प्रभारी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना आज दिला.
सांगेली येथील नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून बोगस प्रवेश मिळविला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शिवसेनेने हा विषय लावून धरला आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेदरम्यानही शिवसेनेने आंदोलन छेडत पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अटकाव केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. परजिल्ह्यातील विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यातील शाळेमध्ये प्रवेश दाखवून येथील रहिवासी दाखला मिळवतात. हा दाखला तहसीलदारांमार्फत दिला जात असल्याने अशा विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये सहज प्रवेश मिळतो. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी नवोदयच्या शिक्षणापासून वंचित राहतो, अशी खंत यावेळी व्यक्त झाली. यावेळी चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, श्रुतिका दळवी, परशुराम चलवाडी, योगेश नाईक, एकनाथ नारोजी, अनुष्का कलंबिस्तकर, उल्हास सावंत ,राजू शेटकर आदी उपस्थित होते.
---
३० विद्यार्थ्यांचा समावेश
सांगेलीतील नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परजिल्ह्यातील ३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ते आता प्रवेशासाठी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुरावे व अधिवास दाखला विद्यालयाला देण्यासाठी खोटे कागदपत्रे सादर करतील. यातील ११ विद्यार्थी खोटे प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना जिल्ह्याचा रहिवासी असल्याबाबतचा दाखला देताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करा, असे निवेदनात नमूद आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77561 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..