
रत्नागिरी ः सेना सोडल्याप्रमाणे वागणूक मिळाल्यास वेगळा विचार
फोटो ओळी
rat15p50.jpg- ३६३२५
उदय सामंत
-------------
शिवसेना पक्ष सोडल्याप्रमाणे
वागणूक मिळाल्यास वेगळा विचार
उदय सामंत : उद्धव ठाकरेंसह सर्वांचा गैरसमज दूर होईल
रत्नागिरी, ता. १५ ः आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, जिल्ह्यातील सेना संपेल, असे कृत्य माझ्याकडून होणार नाही. वंदनीय बाळासाहेब यांची शिवसेना उभी राहण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आमदार म्हणून मी पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तरी माझ्यावर टीका झाली. टीकेचा स्तरदेखील सुसंस्कृत असावा. मी शेवटपर्यंत ठाकरे- शिंदे गटाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे साक्षीदार खासदार विनायक राऊत आहेत; परंतु आम्हाला प्रेमाने विचारणारे तिथे कोणी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. दोन महिन्यांत उद्धव ठाकरेंसह सर्वांचा गैरसमज दूर होईल, असे मत माजी मंत्री, आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना भक्कम आहे; परंतु शिवसेना सोडल्याप्रमाणे वागणूक मिळत असेल तर मलाही भविष्यात वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
पाली येथील निवास्थानी पत्रकार परिषदेत श्री. सामंत म्हणाले, ‘‘माझ्या घरच्या ऑफिसमध्ये माझ्यामागे बाळासाहेब, आदित्य या सर्वांचे फोटो आहेत म्हणजे मी सेनेतेच आहे. मेळावा घेऊन माझ्यावर टीका करणाऱ्या राऊतांचाही फोटोआहे. जाण्यापूर्वी मी सर्व कार्यकर्त्यांना बैठकीत सांगितले होते की, शिवसेनेच्या विरोधात घटकपक्ष कारस्थान करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी हा उठाव केला आहे. जोडण्याचा प्रयत्न कोणच करत नव्हते. खासदार राऊत त्याचे साक्षीदार आहेत. शेवटच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो. राष्ट्रीय कार्यकारिणीला मी उपस्थित राहिलो. त्यानंतर आदित्य ठाकरेंना भेटल्यानंतर गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी बाडका, गद्दार, अन्नाला न जागणारा अशी टीका केली. पण मी टीका करण्यासाठी आलेलो नाही, अतिवृष्टीचा आढावा घेणार आहे. मदत दिली का? पंचनामे केले का? याची माहिती घेणार आहे.’’
श्री. सामंत पुढे म्हणाले की, ‘‘ तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेळ मागितली होती. त्यांना भेटण्याचा निर्णय मी घेतला. तीन जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांची संख्या केवढी आहे, यातून बोध घेण्याची गरज आहे; पण एकाही व्यक्तीला मी शिवसेनेतून बाहेर आलो, असे सांगितले नाही. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. यामध्ये यश येईल; पण १०० टक्के लोकांनी सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय महत्त्वाचा होता. आज मला भेटणाऱ्यांना मी सांगितले, विचलित होऊ नका. शिवसेनेचे काम करतोय, शिवसेनेतच आहोत.’’
-------------
चौकट-
मुख्यमंत्र्यांकडून लगेच कार्यवाही
रत्नागिरीसाठी भरीव काहीतरी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मला विचारले. तेव्हा मी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली. विश्वास बसणार नाही. लगेच माझ्याकडे नोटीस आली आहे. मेडिकल कॉलेजसाठी कमिटी नेमली आहे. आठ दिवसांत ती कमिटी शासनाला अहवाल देणार आहे. पुढच्या वर्षी मेडिकल कॉलेज सुरू होईल आणि जिल्ह्यातील डॉक्टरची कमतरता दूर होईल. गेली अनेक वर्षे यासाठी प्रयत्न करत होतो. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यावर कार्यवाही केली, असे सामंत म्हणाले.
चौकट-
मला सार्थ अभिमान
जिल्ह्यासाठी आता शासकीय विधी महाविद्यालय मंजूर झाले आहे. पुढच्या वर्षी त्याच्या कामाला सुरुवात होईल. एकनाथ शिंदेंच्या कामाची ही पद्धत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. त्याला साथ देणाऱ्यामध्ये रत्नागिरीचा एक आमदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सामंत म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77677 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..