
रत्नागिरी ः अजस्त्र लाटांनी बंधारा तोडून पाणी शिरले वस्तीत
36544
रत्नागिरी ः समुद्राच्या अजस्त्र लाटा फुटून बंधाऱ्यावरून अशा मानवी वस्तीमध्ये शिरत होत्या.
36546
किनाऱ्यावर लाटांचे थैमान.
००००००००००
लाटांनी बंधारा फोडून पाणी वस्तीत
उधाणाचा फटका; भाटीमिऱ्या, जाकिमिऱ्या, आलावा भयभीत
रत्नागिरी, ता. १६ ः सलग दोन दिवस असलेल्या समुद्राच्या उधाणाचा फटका भाटीमिऱ्या, जाकिमिऱ्या, आलावा भागाला बसला. ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत असल्याने समुद्राचे पाणी बंधारा ओलांडून वस्तीत शिरले; तर आलावा भागात बंधाराच समुद्राने गिळंकृत केल्याने भगदाड पडले आहे. समुद्राचे रौद्ररूप पाहून किनारी भागातील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे. लवकरात लवकर पक्क्या बंधाऱ्याचे काम व्हावे आणि प्रशासनाने वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ काम करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
जुलै महिन्यातील भरतीकडे (हायटाईड) सर्वांचे लक्ष होते. याची सर्वांत जास्त चिंता पांढरा समुद्र, भाटीमिऱ्या, आलावा, जाकिमिऱ्या भागाला असते. सुमारे साडेतीन किलोमीटरचा धूपप्रतिबंधारा या भागातूनच गेला आहे. त्यामुळे दरवर्षी उधाणामुळे या बांधाऱ्याला ठिकठिकाणी भगदाड पडते. बंधाऱ्याची पावसापूर्वीची दुरुस्ती म्हणून ४ ठिकाणी वाहून गेलेल्या धूपप्रतिबंधाऱ्याचे काम नुकतेच पत्तन विभागाने केले. त्यामुळे यंदा उधाणाचे पाणी वस्तीमध्ये येण्याची शक्यता कमी होती. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १६४ कोटींच्या नवीन पक्क्या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरू होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने उधाणाच्या तारखा जाहीर करून या कालावधीमध्ये किनारी भागातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कालपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे. सलग दोन दिवस ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटांच्या माऱ्याने आलावा भागातील पाटीवाडी येथे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट मानवी वस्तीत शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
समुद्रात लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. नुकतीच पौर्णिमा झाली आणि या पौर्णिमेनंतर मोठी भरती आली. त्यातच समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टी भागाला फटका बसला आहे. तीन घरापर्यंत समुद्राचे पाणी आले होते. जाकिमिऱ्या येथील संदीप शिरधनकर, संतोष पाटील, योगेश पाटील, कुंदन शिवलकर आदींच्या घरापर्यंत उधाणाचे पाणी आले होते. याबाबतची माहिती पतन विभागाला देण्यात आली. पतनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करू, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
---------
कोट...
सलग दोन दिवस उधाणाची भरती आल्याने धूपप्रतिबंधक बंधारा तोडून पाणी घरापर्यंत आले. भविष्यात हा धोका वाढणार नाहे. त्यामुळे पत्तन विभागाने तत्काळ वाहून गेलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून आम्हाला संरक्षण द्यावे. तसेच, नवीन बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर करावे.
- योगेश पाटील, आलावा
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77947 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..