
रत्नागिरी-सिंधुदुर्गात 2024 ला भाजपचा खासदार
खासदार राऊतांनी बेछूट आरोप थांबवावेत
भाजप नेते पटवर्धन; पुन्हा निवडून येऊन दाखवावे
रत्नागिरी, ता. १६ ः सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर वाट्टेल, त्या भाषेत टीका करत आहेत. राऊतांचा तोल गेला आहे, त्यांनी असे बेछूट आरोप करणे बंद करावे. हिंमत असेल तर त्यांनी २०२४ ला या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान भारतीय जनता युवामोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिले. तसेच या मतदार संघात भाजपाचाच उमेदवार खासदार म्हणून विजयी होईल, असा दावाही केला आहे.
खासदार राऊत हे भाजपा-शिवसेना युतीच्या कालावधीत दोनवेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकद त्यांच्या पाठीशी होती; परंतु आता नाहीये. हिंमत असेल तर आता पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे भाजप कार्यकर्ते बोलू लागले आहेत, असा इशारा या वेळी पटवर्धन यांनी दिला.
महाराष्ट्रात सत्तांतर नाट्य घडल्यानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार विनायक राऊत हे भाजपच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. ते वाईट भाषेत बोलत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाचे तमाम कार्यकर्ते सज्ज आहेत; पण आम्ही त्यांच्यासारख्या वाईट भाषेत उत्तर देऊ शकत नाही, ती भाजपाची संस्कृती नाही, असे पटवर्धन यांनी सांगितले. भाजपाचा झेंडा अनेक दशके खांद्यावर घेतलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी निष्ठा शिकवू नये, असा इशाराही पटवर्धन यांनी नाव न घेता दिला.
--------------------------------
चौकट
त्या वेळी ते राऊतांसाठी चांगले
२०१४ व २०१९ मध्ये आमदार उदय सामंत हे शिवसेनेतच होते आणि त्या वेळी ते राऊतांसाठी चांगले होते. राऊत त्यांचा डंका पिटत होते; पण आता सामंत हे शिंदे गटात गेल्यावर असे काय झाले? असा सवाल पटवर्धन यांनी उपस्थित केला. राऊतांच्या मताधिक्क्यात दीड लाख मते भाजपची होती, हे त्यांनी विसरू नये, असाही टोला पटवर्धन यांनी लगावला.
---------------
चौकट
हे राजकारण योग्य नव्हे..
एका राऊतांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच ४० आमदार बाहेर पडले आणि हिंदुत्वासाठी भाजपासोबत युती केली आहे. त्यामुळे आता दुसरे राऊत वाईट भाषेत बोलून राहिलेली इज्जतसुद्धा घालवत आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करून प्रसिद्धी मिळवत आहेत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला, हे राजकारण योग्य नव्हे, असेही त्यांनी बजावले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77957 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..