शिवसेनेवरील निष्ठेचे प्रतिज्ञापत्र तहसीलदारांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena
पान 1)

शिवसेनेवरील निष्ठेचे प्रतिज्ञापत्र तहसीलदारांना

चिपळूण - शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडखोरीमुळे पक्षावर मोठे संकट कोसळले आहे. आता पक्षहितासाठी व नव्याने उभारी घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र व ऑनलाईन सदस्य नोंदणी करून घेतली जात आहे. यासाठी नेत्यांनी केलेल्या आवाहनाला पदाधिकाऱ्यांमधून प्रतिसाद दिला जात आहे. निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र थेट तहसीलदारांसमोर केले जात आहे. चिपळुणात अशा तऱ्हेने प्रतिज्ञापत्र करण्यात आली आहेत.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ४० आमदारांनी स्वतंत्ररीत्या भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. यावेळी विधिमंडळातील संख्याबळाचा तांत्रिक आधार घेऊन आम्ही म्हणजेच शिवसेना, शिवसेनेची निशाणी ती आमचीच, असा दावा बंडखोर गटाने केला आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली असून, पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तशी नोंदणी आहे.

शिवसेनेचे ६ लाख सदस्य आहेत. पक्षाची स्वतंत्र घटना व कार्यप्रणाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच संघटनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे, हे दाखवण्याची आज वेळ आली असल्याचे आमदार भास्कर जाधव व जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी स्पष्ट करत, तसे आवाहनही केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांमधून प्रतिज्ञापत्र सादर केले जात आहे. शिवाय पक्षाने ऑनलाईन सदस्यनोंदणी सुरू केली आहे. प्रत्येक गावातील पक्षाचा सरपंच, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपाध्यक्षांचे प्रतिज्ञापत्र जिल्हाप्रमुखांकडे सादर केले जात आहे. आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तहसीलदारांसमोर जाऊन पक्षावर निष्ठा व पाठिंबा बाबतचे प्रतिज्ञापत्र अथवा शपथपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सावंत यांच्या शपथपत्राविषयी जोरदार चर्चा आहे.

असे आहे शपथपत्र
शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी तहसीलदारांसमक्ष शपथपत्र केले आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले की, शिवसेना पक्षाच्या घटनेवर आपली पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आदर्श व तत्त्वावर अढळ निष्ठा आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असून बिनशर्त पाठिंबा देत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही सावंत यांनी प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्रातून दिली आहे.

मुळातच शिवसैनिक हा निष्ठावान असून, ते तपासण्याची कधीही गरज नाही. जे पक्ष सोडून गेले त्या बंडखोरांनादेखील पक्ष हवा आहे; परंतु आता त्यांना कार्यकर्त्यांची निष्ठा दाखवण्याची वेळ आली असून, त्यासाठीच तहसीलदारांसमोर शपथपत्र करून पक्षाकडे दिले आहे. यापेक्षाही कठोर शिक्षेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले तरी आमच्या शिवसैनिकांची तयारी राहील. कोकणातील शिवसैनिक सह्याद्रीसारखाच पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
- संदीप सावंत, तालुकाप्रमुख चिपळूण.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77995 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top