
कोकण रेल्वे मार्गावर मेमू कायम सुरू ठेवा
कोकण रेल्वे मार्गावर
मेमू कायम सुरू ठेवा
शौकत मुकादम ; रोहाऐवजी पनवेल येथून सोडा
चिपळूण, ता. १७ ः गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण मेमू गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आठ डब्यांच्या या गाडीलाही गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्याला आणखी चार डबे जोडून ती एकूण बारा डब्यांची चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
गाडी क्रमांक ०११५७ आणि ०११५८ ही गाडी १९ ऑगस्टपासून बारा डब्यांची रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. या रेल्वेच्या एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. मेमू माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात या गाडीला थांबा असणार आहे. रोहा ते चिपळूण अवघ्या ९० रुपयांत प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे रोहा येथून न सोडता ती पनवेल येथून सोडण्यात यावी आणि ती कायमस्वरूपी करण्यात यावी अशी मागणी श्री. मुकादम यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. कोकण रेल्वे मार्गाचा कोकणातील लोकांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे मेमू ही गाडी कोकणातील चाकरमान्यांसाठी हक्काची होईल. तसेच ही गाडी रोहा येथून न सोडता पनवेल येथून सोडण्यात यावी. म्हणजे चाकरमान्यांना त्याचा जास्त फायदा होईल. असे श्री. मुकादम यांनी पत्रात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78205 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..