रत्नागिरी-बालेकिल्ल्यातच शिवसेना टिकवण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-बालेकिल्ल्यातच शिवसेना टिकवण्याचे आव्हान
रत्नागिरी-बालेकिल्ल्यातच शिवसेना टिकवण्याचे आव्हान

रत्नागिरी-बालेकिल्ल्यातच शिवसेना टिकवण्याचे आव्हान

sakal_logo
By

rat17p22.jpg-

रत्नागिरी जिल्हा
----------

रत्नागिरी जिल्हा---लोगो

बालेकिल्ल्यातच शिवसेना टिकवण्याचे आव्हान
दोन मतदारसंघात संघटना खिळखिळीः मंत्रिमंडळ विस्तारानंतर चित्र होणार स्पष्ट
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ः एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेला बसत आहे. माजी मंत्री आमदार उदय सामंत, आमदार योगेश कदम यांच्या रत्नागिरी-संगमेश्‍वर आणि खेड-दापोली-मंडणगड या दोन मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात सामील होणे पसंत केल्याने तेथील शिवसेना खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. या सर्वांचा परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघावर होत असून बालेकिल्ल्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे शिवसेना टिकवण्याचे आव्हान आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर कदम, सामंतांनी गुवाहटीला जाणे पसंत केले. गेल्या काही दिवसात शिवसेनेकडून सभासद नोंदणीसह प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरवात केल्यामुळे शिंदे गटानेही नगरसेवक, पदाधिकारी यांना आपलेसे करण्यास आरंभ केला आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरवात केली आहे. काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना घेऊन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. पाठोपाठ रत्नागिरीचे आमदार सामंत यांनीही मतदारसंघात दौरा करत चाचपणी केली. पाली येथे त्यांचे स्वागतही जोरदार झाले. यावेळी पाली गणासह वाटद आणि खाडीपट्ट्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तर त्याच दिवशी सायंकाळी शहरातील सुमारे १९ नगरसेवकांसह शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांनी सामंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यातील काही नेतेही सामंतांच्या संपर्कात असून मंत्रीपदाच्या निवडीनंतर मोठा गट सामंतांकडे सक्रिय होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेकडून राबविण्यात येत असलेल्या सभासद नोंदणीचे आव्हानच आहे.
बंडखोरीनंतर दोन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही नेत्यांच्या जाण्यामुळे भविष्यात सेनेच्या वाढीला खीळ बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सामंतांच्या बंडाचा परिणाम लांजा-राजापूर मतदारसंघावरही होऊ शकतो. या दोन्ही तालुक्यात सामंतांनी काहीअंशी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते तथा आमदार राजन साळवींची राजापुरमध्ये चांगली ताकद आहे, पण लांज्यात त्यांना विरोध होत आहे. हाच मुद्दा भविष्यात शिवसेनेत गट पडण्याला कारणीभूत ठरु शकतो. चिपळूण मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर निकम यांची चांगली पकड आहे. शिवसेनेतील या गोंधळामुळे तेथील सैनिकही थोडे बिथरलेलेच आहेत. शिवसेनेच्या माजी आमदार चव्हाण यांचे पूर्वीसारखे प्रस्थ राहिलेले नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या साथीने चिपळुणात बस्तान मांडायचा प्रयत्न करत असले तरीही त्यांना शिवसैनिक किती आपलेसे करतील याबाबत साशंकताच आहे. संगमेश्‍वर तालुक्यात सामंत यांचा थोडासा शिरकाव आधीच झाला असल्याने रत्नागिरीचे लोण तिकडेही पसरण्यास वेळ लागणार नाही. गुहागर वगळता अन्य चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्याचे आव्हानच आहे.

चौकट
जुन्या, ज्येष्ठांवर भिस्त
जिल्ह्याच्या उत्तर भागातील पडझड रोखण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी जोर धरला आहे. तर दक्षिण भागात खासदार विनायक राऊत यांच्यासह उपनेते आमदार राजन साळवींवर भविष्यातील भिस्त राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78206 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..