
पुरातून सावरताच शेतीची लगबग
36820
खारेपाटण ः येथील केदारेश्वर परिसरात अंतिम टप्प्यात आलेली भात लावणीची कामे. (छायाचित्र : रमेश जामसांडेकर)
पुरातून सावरताच शेतीची धांदल
खारेपाटण दशक्रोशीची स्थिती; भातरोप लावणीसह नाचणी, तीळ लागवडीची कामे सुरू
सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण, ता. १८ ः गेले दोन ते दिवस दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खारेपाटण दशक्रोशीतील भात लावणीची कामे पूर्णत्वास आली आहेत. पुराच्या तडाख्यामुळे यंदाही भातशेतीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, लावणी कामांच्या पूर्णत्वानंतर येथील शेतकऱ्यांनी नापणी, तीळ, तूर, उडीद आदी लागवडीच्या कामांना प्रारंभ केला आहे.
खारेपाटण दशक्रोशीत आषाढी एकादशीपूर्वी भात लावणीची कामे पूर्ण होतात. त्यानंतर येथील शेतकरी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी रवाना होतात. मात्र, यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. त्यात महिनाभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने विजयदुर्ग खाडीकिनारी भागातील भात शेतीमध्ये गुडगाभर पाणी साचून राहिले होती. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत भात लावणीची कामे खोळंबली होती. यंदाही विजयदुर्ग खाडीकाठच्या गावांमध्ये आठ ते दहा दिवस भातशेतीमध्ये पुराचे पाणी राहिले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भात रोपे कुजली. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे भात लावणीची कामे वेगाने सुरू झाली होती. पुढील दोन ते चार दिवसांत भात लावणीची कामे पूर्ण होणार असल्याचे शेतकरी बांधवांतून सांगण्यात आले.
खारेपाटण, चिंचवली तसेच लगतच्या अनेक गावांमध्ये बारमाही पिके घेतली जातात. त्यामुळे आता भातलावणीच्या कामानंतर डोंगर उताराच्या जमिनीवर तूर, तीळ, उडीद, मूग, नाचणी आदी पिकांच्या लागवड कामांना सुरवात झाली आहे. याखेरीज गणेशोत्सवात मागणी असणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या, चिबूड, काकडी, झेंडूची फुले आदी पिकांचीही देखभाल आणि लागवड शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
----
‘पॉवर टिलर’द्वारे मशागत
दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी बैलजोडी परवडत नसल्याने पॉवर टिलरच्या माध्यमातूनच मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले. सरासरी ८० ते ९० टक्के शेतीची कामे पॉवर टिलरच्या माध्यमातून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानाच्या माध्यमातून पॉवर टिलर उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाकडे मागणी केली आहे. पॉवर टिलरचे प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावेत, अशीही इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78368 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..