
गणेशोत्सवात २४ फेऱ्यांना स्पेशल भाडे आकारणी
गणेशोत्सवात २४ फेऱ्यांना
स्पेशल भाडे आकारणी
कोकण रेल्वे ः १७२ गाड्यांची घोषणा
कणकवली, ता. १८ ः गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल् मार्गावर यंदा तब्बल १७२ विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. यातील २४ फेऱ्यांना स्पेशल भाडे आकारणी होणार असून नियमित धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा तीस टक्के अधिक तिकीट दर असणार आहे.
कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर यंदा तब्बल १७२ विशेष एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या सर्वच गाड्यांचे बुकिंग देखील सुरू झाले असून २० ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंतच्या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. याखेरीज परतीच्या ३ ते १० सप्टेंबरपर्यंतच्याही गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
गणेशोत्सवातील विशेष गाड्यांमधील २४ गाड्यांना रेल्वे प्रशासनाने स्पेशल भाडे आकारणी केली आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल ते ठोकूर, मुंबई सेंट्रल ते मडगाव, बांद्रा ते कुडाळ, उधना ते मडगाव, कुडाळ ते अहमदाबाद या गाड्यांचा समावेश आहे. या स्पेशल भाडे असलेल्या गाड्यांचे आरक्षण आजपासून (ता. १८) सुरू झाले. या गाड्यांनाही चाकरमान्यांकडून पसंती राहिली असून आरक्षणही फुल्ल झाले. कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या ‘कोकणकन्या’, ‘मांडवी’, ‘तुतारी’, ‘मंगलोर’ एक्स्प्रेस आदी गाड्यांना मुंबई ते कणकवलीपर्यंतच्या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ३३५ ते ३४० रुपयांची तिकिट आकारणी होते; मात्र स्पेशल भाडे असलेल्या गाड्यांना मुंबई ते कणकवली या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ४३० रुपये मोजावे लागणार आहेत. याच अंतराच्या नियमित गाड्यातील वातानुकूलित थ्री टायर प्रवासासाठी ९६५ रुपये दर, तर स्पेशल भाडे असणाऱ्या गाड्यांसाठी ११७० रुपये एवढा दर निश्चित केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78369 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..