
संक्षिप्त
धामणी शाळेतील विद्यार्थी
बसले हक्काच्या वर्गात
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा धामणी नं. १ आपल्या स्वतःच्या इमारतीत भरवली जाऊ लागल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण ३२ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. पूर्वी येथे कौलारू छप्पराची जुनी इमारत होती; मात्र नवीन इमारतीसाठी २०१९ मध्ये जुनी इमारत पाडण्यात आली होती. त्यानंतर शाळा ग्रामपंचायतीच्या सभागृहात भरली जात होती; मात्र याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परिसरातील साफसफाई व इतर कामे करून शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या वर्गात शिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. शालेय व्यवस्थापन समितीने नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
-------------
राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे
संगमेश्वर ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे मालपवाडी येथे मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे जीवघेण्या अपघाताला निमंत्रण देत आहे. पावसानंतर एकाच महिन्यात हे खड्डे पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग कधी येणार, असा सर्वसामान्य वाहनधारकांचा प्रश्न आहे. बऱ्याच गाड्यांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे. समोरासमोर गाड्या आल्या तर नक्की गाडी कुठून चालवायची? त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरावेत, असे वाहनचालक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
---------------
पेट्रोल व डिझेलवरील कर कमी
करण्याच्या निर्णयाचे स्वागत
रत्नागिरी ः राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रात डिझेलचे जे दर कमी होणार आहेत त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या बॉर्डरना त्याचा फायदा होईल. तिकडून येणारे महाराष्ट्रात डिझेल भरतील. कारण, जेव्हा आपल्याकडे या राज्यांपेक्षा दर जास्त होता, तेव्हा बॉर्डरवरचा सेल या राज्यात जात होता; पण आता आपल्याकडे दर कमी झाल्याने महाराष्ट्रातील विक्री वाढेल, असे लोध या वेळी म्हणाले. दरम्यान, कर्नाटक आणि गोवा हे आपल्याकडील दरापेक्षा अजूनही स्वस्त असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
----------
पोषण आहारासाठी शेगडी व कुकर भेट
संगमेश्वर ः जि. प. प्राथमिक शाळा भडकंबा नवालेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शेगडी व १२ लिटर क्षमतेचा कुकर भेट देण्यात आला. शाळेचे विद्यार्थी धनंजय नवले यांनी त्यांचे वडील (कै.) रामचंद्र धोंडू नवले यांच्या स्मरणार्थ शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून शाळेला ही देणगी मिळावी, यासाठी सरपंच कमलेश मावळणकर यांनी पुढाकार घेत सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी देणगीदार नवाले यांच्यासोबत सरपंच कमलेश मावळणकर, मुख्याध्यापिका शेडे, किल्लेदार, शिंदे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची गरज ओळखून ही देणगी देण्यात आली. त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी नवाले यांचे आभार मानले.
------------
हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे
देवरूख ः भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली. म्हणून केंद्र सरकारने या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशात ११ ते १७ ऑगस्ट या दरम्यान राबवला जाणार असून त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर तसेच आस्थापनेवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करून हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांनी केले आहे. या उपक्रमाच्या जाणीव जागृतीसाठी चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभातफेरी आयोजन, पालक-शिक्षकसभा, तिरंगा संमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन विविध विभागाकडून करणार आहे. ध्वजसंहिता मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर, आस्थापनेवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांना राष्ट्रध्वज हवा असेल त्यांना नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78522 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..