
रत्नागिरी-गुळगुळीत रस्ते 3 महिन्यातच खड्ड्यात
फोटो ओळी
-rat18p23.jpg-
३६९२९
रत्नागिरी ः शहरातील गीता भवन येथील रस्त्यावर पडलेले खड्डे.
-----------
गुळगुळीत रस्ते तीन महिन्यांतच खड्ड्यात
रत्नागिरीचे दुखणे; दिलासा औटघटकेचाच
रत्नागिरी, ता. १८ : शहरातील रस्ते तीन महिन्यांतच पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. यावरून रस्त्यांचा दर्जा लक्षात येतो. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, दोन ठेकेदारांना तत्काळ रस्ते दुरुस्तीचे तोंडी आदेश दिले आहेत. पावसाची उसंत मिळताच खड्डे भरण्याचे काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सुधारित पाणी योजनेच्या खोदाईमुळे शहरातील खड्ड्यांची चाळण झाली होती. चार ते सहा महिन्यांच्या त्रासानंतर रस्ते गुळगुळीत झाले आणि शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, हे सर्व औटघटकेचे ठरले.
शहरामध्ये सुधारित पाणी योजना आणि सीएनजी गॅस लाइन टाकण्यासाठी सर्वत्र खोदाई झाली. हे काम अनेक महिने चालले. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले. नागरिकांना शहरातून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी होत होती. अनेकांना रस्ते खड्ड्यात गेल्याने मणक्याचा त्रास होऊ लागला. शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या नावे नागरिकांनी अक्षरशः ओरड सुरू केली. परंतु विकासासाठी ही कामे होणे देखील महत्त्वाचे होते. अखेर तत्कालीन मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने शहराच्या मुख्य रस्त्यासह सर्व अंतर्गत रस्त्यांसाठी सुमारे १५ ते १८ कोटी रुपये मंजूर झाले. या निधीमध्ये पावसापूर्वी शहरातील रस्त्याची कामे सुरू झाली. शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत झाले. त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले.
खोदण्यात आलेल्या चरी योग्य प्रकारे बुजविण्यात आल्या नव्हत्या. पावसामध्ये या सर्व चरी खचल्याने शहरामध्ये तीन महिन्यांपूर्वी केलेले रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. शहरातील मारुती मंदिर, आठवडा बाजार, बसस्थानक, गीता भवन, मांडवी, प्रमोद महाजन क्रीडांगण आदी भागात ही परिस्थिती आहे. चर खचल्याचे प्रकार काही ठिकाणी असले, तरी अनेक ठिकाणी रस्त्यांचा दर्जा कमी असल्याने खड्डे पडल्याचे दिसत आहे. मारुती मंदिर सर्कलला चांगलेच खड्डे पडले आहेत. ते भरण्यात आले तरी पुन्हा पडले आहेत. आठवडा बाजार, बसस्थानक येथील खड्डे देखील वारंवार भरावे लागत आहेत.
चौकट
नागरिकांच्या पैशाचा अपव्यय
पडणारा पाऊस आणि शहरातील वाहतुकीचा विचार करून रस्त्यांचा दर्जा असणे आवश्यक आहे. मात्र, त्याचा विचार होताना दिसत नाही. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने दोन ठेकेदारांना तोंडी आदेश देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. पाऊस थांबल्यानंतर हे काम करून घेतले जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78598 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..