
भाजपने सत्ताकाळात काय केले?
भाजपने सत्ताकाळात काय केले?
विलास साळसकर ः पावणेदोन कोटीच्या दुरुस्ती खर्चाचा लेखाजोखा द्या
देवगड, ता. १८ ः देवगड जामसंडे शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी काय केले म्हणून भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याआधी भाजप सत्तेत असताना दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे एक कोटी ४७ लाख ८ हजार २९३ रुपये खर्च केल्याचा लेखाजोखा जनतेला आधी द्यावा, असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिले. पाण्याचा प्रश्न तसाच भिजत ठेवून पुन्हा त्याच आधारे सत्तेवर येण्याचे भाजपचे मनसुबे फसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
येथील पाणीप्रश्नावरून भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. याचा आधार घेत श्री. साळसकर यांनी माध्यमांसमोर भाजपचा समाचार घेतला. साळसकर म्हणाले, ‘‘नगरपंचायतीमध्ये भाजप सत्तेवर असताना २७ फेब्रुवारी २०१९च्या ठराव क्रमांक १५ नुसार ५२ लाख ३४ हजार ९४८, ठराव १६ नुसार ५१ लाख ७० हजार ११६ आणि ठराव १७ नुसार ४३ लाख ३ हजार २२९ असे एकूण सुमारे एक कोटी ४७ लाख ८ हजार २९३ रुपये दहिबांव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर खर्च केल्याचे दाखवले आहे. यामध्ये त्यांनी कोणती दुरुस्ती केली? कशावर एवढा खर्च केला? याची माहिती हिंमत असेल तर जनतेला द्यावी. पाण्याचे पंपही जुनेच असून, त्यामध्येही काही सुधारणा नाही. २०१९ पासून नगरपंचायतीमधील भाजपची सत्ता जाईपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ नगरपंचायत ते ओरोस एवढाच त्यांच्या फाईलचा प्रवास होता. मुळात त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवायचाच नव्हता. पाण्याचा प्रश्न तसाच भिजत ठेवून पुन्हा त्याच आधारे सत्तेवर येण्याचे त्यांचे मनसुबे होते; मात्र ते फसले. आम्ही निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येथील पाण्याचा प्रश्न लवकरच निकाली निघेल. याची सर्व प्रशासकीय पूर्तता झाली असून, सुमारे ९० टक्के काम झाले आहे. आता राज्यातील राजकीय घडामोडी शांत होऊन राज्य सरकार स्थिरस्थावर झाल्यावर याबाबतचा अध्यादेश निघून पाण्याचा प्रश्न कायमचा संपेल.’’
..................
कोट
36994
नगरपंचायतीमध्ये शिवसेना सत्तेत येऊन मोजकेच महिने झाले आहेत; मात्र सत्ताधाऱ्यांनी काय केले म्हणून भाजप नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत असेल, तर भाजपने सत्तेत असताना दुरुस्तीसाठी एवढा खर्च करून काय केले? हिंमत असेल तर दहिबांवपासून देवगड टाकीपर्यंत कोणती दुरुस्ती केली याची सविस्तर माहिती जनतेला द्यावी.
- विलास साळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78610 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..