केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’
केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’

केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’

sakal_logo
By

37124
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना संजय पडते. शेजारी जानवी सावंत, रुपेश राऊळ, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार आदी (छायाचित्र ः रुपेश हिराप)


केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’

संजय पडते ः आमदारकीची दोन वर्षे ढकलावीत

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः आमदार दीपक केसरकर शिंदे गटासोबत गेल्याने सावंतवाडी मतदारसंघामध्ये शिवसेना आझाद झाली. त्यामुळे अजूनही मी शिवसेनेत आहे, असे म्हणून केसरकरांनी जनतेची फसवणूक करू नये. स्वतःची उरलेली दोन वर्षे त्यांनी कशीबशी ढकलावीत, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केली.
मंत्रिपदाच्या लालसेपोटी शिंदे गटासोबत गेलेल्या केसरकरांनी कधीच संघटना बांधली नाही. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही. येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार या ठिकाणी देतील, त्याला निवडून आणू, असा दावाही श्री. पडते यांनी केला. श्री. पडते आज सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील शिवसेना शाखेमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, मायकल डिसोजा, सुनील गावडे, गुणाजी गावडे, रश्मी माळवदे, स्नेहा मिठबावकर, अनुष्का कलंबिस्तकर, भारती कासार आदी उपस्थित होते.
पडते म्हणाले, ‘‘सावंतवाडी तालुक्यामध्ये केसरकरांसोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते गेले आहेत. तेही राष्ट्रवादीमधून आलेले कार्यकर्ते आहेत; मात्र सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेमध्येच थांबला आहे. आम्ही आज कोण गेले, कोण जाणार याची पर्वा करत नाही, तर जे कोणी गेले त्यांच्या जागी नव्याने पदाधिकारी नियुक्त करून शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम हाती घेतले आहे. आजही शिवसेना हा एक विचार आहे. त्यांनी सत्तेचा आव कधीच धरला नाही. आमदार केसरकर केवळ मंत्रिपदासाठी शिंदे गटासोबत गेले. त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही. उलट आम्हाला आमदार वैभव नाईकांचा अभिमान आहे. केसरकरांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत जी माणसे होती, त्यांनीही याचे आत्मपरीक्षण करावे.’’
पडते पुढे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांची कदर नसलेले केसरकर कोरोना काळात मुंबईत लपून बसले होते. शिवसेनेच्या जोरावर मंत्रिपद भोगलेल्या केसरकरांनी येथील जनतेला विकासाची अनेक स्वप्ने दाखविली. चष्मा कारखाना, सेटअप बॉक्स आणि अनेक प्रकल्प आणणार, असे सांगितले; मात्र हे प्रकल्प कुठे आहेत? केसरकरांनी जनतेची फसवणूक केली आहे. शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ आदी प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात झाले. येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४० कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनीच दिले होते; मात्र ते केवळ केसरकरांच्या हट्टामुळे आजही पडून आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना काय असते आणि काय आहे, हे रस्त्यावर उतरून दाखवून दिले जाईल. भविष्यातील सर्व निवडणुका शिवसेना म्हणूनच लढविल्या जातील. त्यामुळे केसरकरांनी ‘अजूनही मी शिवसेनेतच आहे’, असे सांगून जनतेची फसवणूक थांबवावी. जी काही दोन वर्षे शिल्लक राहिली आहेत, ती व्यवस्थितपणे पूर्ण करावीत.’’
--
भाषाही बदलली
केसरकरांची राजकीय वाटचाल पाहता पक्ष बदलल्यावर त्यांची भाषा बदलते, असे दिसते. आताही त्यांची भाषा बदलली असून इतके दिवस उद्धव ठाकरे यांचे गुणगान गाणारे केसरकर आज एकनाथ शिंदेंचे गुणगान करीत आहेत, अशी टीका यावेळी जानवी सावंत यांनी केली.
...................
37126
सावंतवाडी ः नवनियुक्तांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख संजय पडते, जानवी सावंत, रुपेश राऊळ, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार आदी.

केसरकर समर्थकांची
शिवसेनेतून हकालपट्टी
सावंतवाडीत घोषणा; नेमले नवे पदाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत राहिलेल्या सावंतवाडी शहरासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या.
यामध्ये सावंतवाडी शहरप्रमुखपदी खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या जागी शैलेश गवंडळकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या जागी चंद्रकांत कासार, माजगाव विभागप्रमुखपदी संजय माजगावकर यांच्या जागी सुनील गावडे यांची नियुक्ती केली. यावेळी काही महिला शाखाप्रमुख तसेच उपतालुकाप्रमुख पदांवर नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भारती कासार यांची उपतालुकाप्रमुखपदी, तर माजगाव विभागप्रमुखपदी श्रेया कासार यांची नियुक्ती केली. शहर शाखाप्रमुखपदी अनिषा चिले, वनश्री वाडकर, संगीता पेडणेकर, अनुष्का कलंबिस्कर, तर प्रगती बामणे यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. निवड झालेल्या सर्वांना जिल्हाप्रमुख संजय पडते तसेच महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत याच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, महिला तालुकाप्रमुख प्रमुख अपर्णा कोठावळे, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, महिला शहरप्रमुख श्रृतिका दळवी, मायकल डिसोजा, युवासेनेचे गुणाजी गावडे, योगेश नाईक, स्नेहा मिठबावकर, नरेंद्र मिठबावकर, विनोद ठाकुर, नरेश मोर्ये, बाळू गावडे, रमेश गावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78782 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..