नाट्य सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य सदर
नाट्य सदर

नाट्य सदर

sakal_logo
By

नाट्यनिपुण सिंधुदुर्ग
--
37193
श्रीनिवास नार्वेकर


पिंपळगावामधून आलेला
कोकण्या ः बाप्पा धारणकर

लीड
सिंधुदुर्गाने नाट्यसृष्टीला दिलेली सगळीच रत्नं कोकणातल्या मूळ मातीतली नसली तरी या मातीत आल्यानंतर या मातीला आपलंसं केलं, इथल्या संस्कृतीला, माणसांना आपलंसं केलं. आपल्या परीने कोकणच्या नाट्यव्यवहारामध्ये खूप काही करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आज इतक्या वर्षांनंतरही या नाट्यनिपुण रत्नांची नावं सिंधुदुर्गाच्या नाट्यइतिहासामध्ये आवर्जून घेतली जाणं क्रमप्राप्त आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे सावंतवाडीचे त्रिंबक धारणकर अर्थातच बाप्पा धारणकर.
- श्रीनिवास नार्वेकर
------------
कोकणातल्या नाट्यसृष्टीत महत्वाचा ठसा उमटवलेल्या सावंतवाडीतल्या नाट्यदर्शन संस्थेचे दिनकर धारणकर यांचे बाप्पा धारणकर हे वडील. दिनकर धारणकरांबद्दल यथावकाश या स्तंभामध्ये सविस्तर येईलच. वर म्हटल्याप्रमाणे अनेकांनी बाहेरुन येऊन सिंधुदुर्गाच्या लाल मातीमध्ये आपले बस्तान बसवले, तिथे स्वत:च्या कर्तृत्वाने आपल्या कामाचा ठसा उमटवला, भविष्यातल्या पिढीला आदर्शवत् ठरेल, असा पाया रचून ठेवला, त्यापैकी एक हे बाप्पा धारणकर. बाप्पा जन्माने ‘कोकण्या’ नव्हेत; पण इथे आल्यावर ते तनामनाने कोकणी झाले आणि त्यानंतरची त्यांची पिढी त्यांचा वारसा याच मातीत पुढे चालवू लागली. बाप्पा मूळचे नाशिकमधल्या पिंपळगावचे. या ना त्या कारणाने त्यांच्या कुटुंबाची फिरती होत राहीली आणि त्यानंतर ते बराच काळ मुंबईत स्थिरावले. नाट्यसृष्टीशी बाप्पांचा संबंध खरं तर योगायोगानेच आला. त्यांचे बालपण गरीबीत गेलेले. कौटुंबिक फिरतीच्या प्रवासातच ते नाशिकला आले आणि तिथे त्यांनी साईनबोर्ड रंगवण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश मिळाले आणि साईनबोर्ड पेंटर म्हणून त्यांची ख्याती झाली. कालांतराने मुंबईत आल्यावरदेखील त्यांचा हा व्यवसाय सुरू राहीला आणि हेच कारण ठरले बाप्पांची नाटकमंडळींशी परिचय होण्याचे. ज्या संगीत नाटक रंगभूमीच्या युगाला आपण ‘सुवर्णयुग’ म्हणतो, ते (बऱ्यापैकी खरंखुरं) युग बाप्पांनी जवळून पाहीलं. त्यामुळे या क्षेत्रातले अनेक बरे-वाईट अनुभव त्यांच्या गाठीशी राहीले. नाट्यविनोद संगीत मंडळींच्या नाटकांचे बोर्ड रंगवण्याचे काम बाप्पा करत होते. हे काम करत असतानाच त्यांची कंपनीच्या मालकांशी अधिक ओळख झाली आणि ते म्हटलं तर-कर्मधर्मसंयोगानेच खऱ्या अर्थाने नाट्यव्यवसायात आले. त्या काळात उत्तम सुविधा असलेली ही नाटककंपनी होती. आर्थिक स्थिती उत्तम होती. या कंपनीच्या नाटकाचे नेपथ्य सरकत्या यंत्रणेवरुन रंगमंचावरुन आपोआप आत येत असे. १९१३ ला असलेल्या या तांत्रिक सुविधेने आजही अचंबित झाल्यास नवल नाही. या कंपनीचे बोर्ड रंगवण्याचा काम करत असतानाच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते या कंपनीचे व्यवस्थापक झाले. बालगंधर्व, गणपतराव जोशी, आप्पासाहेब पटवर्धन, केशवराव भोसले, अच्युत बळवंत कोल्हटकर, नाथमाधव, गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, राम गणेश गडकरी...एक ना अनेक थोरामोठ्यांचा प्रवास बाप्पांनी अगदी जवळून पाहीला. कोणत्याही प्रकारचे व्यसन नसलेल्या बाप्पांना केवळ एकच व्यसन होते, ते म्हणजे नाटकाचे. तेजीत चालणाऱ्या साईनबोर्ड पेंटींगच्या व्यवसायातले पैसे ते नाटकासाठी आणि नाटकातल्या मित्रमंडळींसाठी खर्च करत. सावंतवाडीत बाप्पांनी साईनबोर्ड पेंटींगचा आपला मूळ व्यवसाय कायम ठेवलाच, पण त्यासोबतच त्यांनी ‘सत्यप्रकाश’ हे साप्ताहिक सुरु केले, रबर स्टॅम्पमेकींगचा व्यवसाय सुरु केला, पण सावंतवाडीतल्या वास्तव्यात मात्र त्यांनी नाटकाकडे बऱ्यापैकी तटस्थ वृत्तीनेच पाहीले. बाप्पा धारणकर ही केवळ एक व्यक्ती नाही, तर तो मराठी रंगभूमीचा इतिहास आहे. बाप्पांनी त्यांच्या एकूणच नाट्यक्षेत्रातल्या अनुभवांवर ‘पिंपळगाव ते सुंदरवाडी’ हे पुस्तक लिहीलंय. ते रुढार्थाने आत्मचरित्र नाही, पण तो त्यांनी पाहीलेल्या एका महत्वाच्या काळाचा, महत्वपूर्ण घडामोडींचा इतिहास आहे. त्या काळातली नाटक मंडळ्या, त्यांचे कलाकार, त्यांचे नाट्य व्यवहार (आणि नाट्यबाह्य व्यवहारदेखील) याबद्दलचा परामर्श बाप्पा त्यांचा या पुस्तकामध्ये घेतात. हे वाचताना त्या काळातल्या एकूणच नाट्यसृष्टीचा अंदाज आपल्याला येतो. या क्षेत्रातला एकूणच बरे-वाईटपणा आजही कसा टिकून (!!!) आहे, हे या पुस्तकावरुन आपल्याला कळते. नाटकाच्या अभ्यासकाने हे पुस्तक वाचायला तर हवंच, पण सिंधुदुर्गातल्या नाट्यइतिहासाबद्दल जाणून घेताना आपण नाट्यरसिक म्हणूनही हे पुस्तक एकदा वाचायला हवंच हवं. आता जाता जाता एक गंमत सांगतो. या अख्ख्या स्तंभामध्ये बाप्पा धारणकरांची नाट्याभिरुची, त्यांची नाटकाबाबतची तळमळ, त्या क्षेत्रात झोकून देऊन केलेले काम याबद्दल लिहीलं असलं तरी बाप्पांचा सावंतवाडीतला प्रवेश हा एकूणच नाट्यसृष्टीला कंटाळून झालेला होता. जवळजवळ वीसेक वर्षे वेगवेगळ्या भूमिकांमधून नाट्यसृष्टीमध्ये काम केल्यानंतर त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले, त्यातून मजल दरमजल करत ते कोकणात आले आणि पुढे सावंतवाडीमध्ये स्थायिक झाले. सावंतवाडीमध्ये नाटकाच्या बाबतीत सक्रीय राहून त्यांनी फारसे काही केल्याची माहिती नाही; पण जे काही केले, त्यातून प्रेरणा घेऊन असेल कदाचित आणि अर्थातच एका अस्सल नाटक्याचे रक्त अंगात असल्यामुळेही असेल कदाचित - त्यांच्या चिरंजीवांनी ‘दिनकर धारणकर’ यांनी सिंधुदुर्गाच्या नाट्यसृष्टीला एक समर्थ नाट्यसंस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकांचा अनुभव सिंधुदुर्गातल्या नाट्यरसिकांना दिला.
(आजच्या या लेखासाठी माझी माहिती, बाप्पांनी लिहीलेले ‘पिंपळगाव ते सुंदरवाडी’ हे पुस्तक आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मुखपत्र असलेल्या ‘रंगवाचा’ त्रैमासिकातील डॉ. मेधा सिधये यांचा लेख यांचे साहाय्य झाले आहे.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78868 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..