रत्नागिरी : सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे भरकटलेले बार्ज पालशेत समुद्रकिनारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Barge Reversed
रत्नागिरी : सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे भरकटलेले बार्ज पालशेत समुद्रकिनारी

रत्नागिरी : सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे भरकटलेले बार्ज पालशेत समुद्रकिनारी

गुहागर/रत्नागिरी - मंगळवारी जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी लागले आहे. या बार्जसोबत वाहत आलेल्या वस्तूंना किनाऱ्यावरील नागरिकांनी हात लावू नये, अशा सूचना भारतीय तटरक्षक दलाने दिल्या आहेत. तटरक्षक दल याबाबत ८ जुलैपासून सतर्क होते. टगने ओढून नेत असताना बार्ज सुटून निघाले अन् त्याचा संपर्क तुटला. जयगड परिसरात बार्ज किनाऱ्याला लागेल, असा अंदाज होता; मात्र ते पालशेतकडे भरकटत गेले. बार्जमध्ये कोणीही कर्मचारी नव्हता. त्यापासून तेलतवंगासह कोणताही धोका नाही.

सिंगापूर येथून तेल घेऊन आलेले बार्ज रविवारी (ता. १७ ) रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील १३ नॉटिकल मैल खोल समुद्रात आले असता सकाळी ९.३० च्या सुमारास उलटले. त्यामुळे बार्जमधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये, तसेच काही संशयित वस्तूंबाबत समजून आल्यास पोलिस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जयगड समुद्रात उलटलेले हे बार्ज पावसाळी अजस्त्र लाटांच्या तडाख्याने मंगळवारी गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी लागले आहे. सोमवारी हे बार्ज जेव्हा समुद्रात दिसू लागले तेव्हा मच्छीमारी नौका बुडाल्याची अफवा पसरली होती; मात्र, काही वेळाने हा मोठा बार्ज असल्याचे दिसून आले. तालुक्यातील जयगड समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १३ मैल आत उलटलेल्या सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी लागले. या बार्जबाबत गुहागर पोलिसांनी किनाऱ्यालगतच्या नागरिकांना कळवले आहे. आज बार्ज गुहागरमधील पालशेत समुद्रकिनारी लागला आहे

बार्ज पूर्ण रिकामा होता. त्यामध्ये ना कर्मचारी ना तेल होते. पालशेत किनारी तो लागला आहे. खासगी कंपनीचा तो आहे. तो सिंगापूरहून ओमानला चालला होता. त्याची आम्ही आज पाहणी केली. किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तेलाचा तवंग नाही. किनारा सुरक्षित आहे.

- कॅ. संजय उगलमोगल, प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी

बार्ज टोइंग करून नेला जात होता

८ जुलैला कोलंबोपासून बार्ज टोइंग करून नेला जात असल्याचे कळवण्यात आले. हा बार्ज टोपासून सुटला आणि ९ जुलैला त्याचा रडारशी संपर्क तुटला. पर्यायाने ते रडारवर दिसेनासे झाले. टगने १० जुलैपर्यंत सुटलेला बार्जचा शोध घेतला; मात्र बार्ज बुडाला असावा, असे सूचित करून शोधकार्य थांबवून तशी माहितीही देण्यात आली. तेव्हापासून तटरक्षक दलाची नजर अशा बार्जवरती होती. तटरक्षक दलाची जहाजे आणि विमानांनी या भागात बार्ज दिसतो का, यावर सतत नजर ठेवली होती; मात्र या बार्जपासून तेलाचे प्रदूषण किंवा सागरी सुरक्षेला धोका नव्हता. त्यानंतरच्या २४ तासांत जयगडच्या उत्तरेला ५ नॉटिकल मैल परिसरात कुठेतरी भरकटून लागले असावे, असे पाहणीनंतर सूचित करण्यात आले. या संदर्भात संबंधित शिपिंग कंपनीने हे बार्ज ताब्यात मिळवण्यासाठी आणि तत्काळ करावयाच्या कार्यवाहीसाठी सज्ज राहावे, असे त्यांना सूचित करण्यात आले. भरकटलेला बार्ज तटरक्षक दलाच्या अंदाजानुसार, जयगड बंदराच्या आसपास किनाऱ्याला न लागता ते पार पालशेत बंदरावर गेल्याचे आता निदर्शनास आले आहे. डेप्युटी कमांडंट आशुतोष यांनी याबाबतची माहिती वारंवार सादर केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78888 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..