
उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा
उत्तम आरोग्यासाठी
संतुलित आहार गरजेचा
डॉ. मोरजकर ः दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन
दोडामार्ग, ता. १९ ः कोकणात वातावरण दमट असल्यामुळे व आहाराकडे योग्य पदार्थांचा वापर न केल्याने येथील मुला- मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण खूपच कमी आहे. जंकफूड वापर, बदलती जीवनशैली, आहारात निःसत्व पदार्थांचा वापर यामुळे हे प्रमाण घटते. हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी नियमितपणे पालेभाज्या व फळांचा संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, असे विचार डॉ. योजना मोरजकर यांनी व्यक्त केले.
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या ‘किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन कमी असण्याची कारणे व उपाय’ विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते.
व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बर्वे उपस्थित होते. डॉ. मोरजकर यांनी हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे, जाणवणारी लक्षणे आणि हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचे सांगितले. अळू, पालक, बीट, गाजर, मेथी, डाळिंब, सफरचंद आदी फळांचा वापर आहारात केल्याने हिमोग्लोबीन वाढते, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंधुरत्न प्रतिष्ठान दोडामार्ग शाखेच्या मदतीने २७ जूनला घेतलेल्या रक्तगट व हिमोग्लोबीन शिबिरातील कमी हिमोग्लोबीन असलेल्या विद्यार्थ्याना हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी या व्याख्यानातून सकारात्मक फायदा होईल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाने डॉ. मोरजकर यांनी सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणून हिमोग्लोबीन वाढविण्याच्या दृष्टीने आहार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. राजेंद्र इंगळे यांनी, तर आभार प्रा. प्रीती प्रसादी यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78900 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..