
रत्नागिरी ः ...नियम पाळा अन्यथा कारवाई
37256ः संग्रहीत
...
नियम पाळा अन्यथा, कारवाईला सामोरे जा
स्कूल बसेसना आरटीओ चव्हाण यांचा इशारा; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची
रत्नागिरी, ता. १९ ः विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा भरणा केला जातो. यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्कूलबससाठी वाहतूक नियम अधिक कडक केले आहेत. अधिनियम २०११ नुसार नियमावली जारी केली आहे; मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूलबसेस धारकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा स्कूलबस परिवहन समितीने दिला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूलबस परिवहन समितीची नुकतीच बैठक झाली. शाळा सुटल्यावर व शाळेत मुले येताना त्याची पाहणी करणे ही शाळेची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक झाली पाहिजे. चालकांकडून नियम पाळले जात आहेत की नाहीत, वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून आणले जात नाही ना, वाहनांची कागदपत्रे व इतर नियमावली पूर्ण असल्याची खातरजमा शाळेने करायची आहे, या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरटीओ जयंत चव्हण यांनीदेखील कार्यालयात स्कूल बसचालकांची बैठक घेतली. सर्व नियमावलींची पूर्तता करून सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्कूल बसधारकांनी नियमावलीची अंमलबजावणी केल्यास कोणतीही कारवाई होणार नाही; मात्र त्यांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. या संदर्भात एक मार्गदर्शक पुस्तिकाही आरटीओ कार्यालयाकडून प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचे वाटप सर्व स्कूल बसचालकांना केले. सर्व शाळांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून नियमावलीबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
-------------
चौकट
त्या सर्व वाहनांचा समावेश
जिल्हा स्कूल बस परिवहन समितीने जिल्ह्यातील सर्व शाळांनी परिवहन समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या. त्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी व पालिका, शिक्षण विभाग यांच्यामार्फत सदस्य सचिव आरटीओंकडे द्यायचा आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचा यामध्ये समावेश आहे. याविषयी कोणतीही तक्रार असल्यास ०२३५२-२२९४४४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ जयंत चव्हाण यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78944 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..