मुंबई-गोवा महामार्गावर बांदा, नेमळेत नवे पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two new bridges will be constructed on  Mumbai Goa highway at Banda Nemale
पान एक-महामार्गावर बांदा, नेमळेत नवे पूल

मुंबई-गोवा महामार्गावर बांदा, नेमळेत नवे पूल

कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावर बांदा आणि नेमळे येथे दोन नवीन पूल होणार आहेत. सटमटवाडी आणि इन्सुली फाटा येथे दोन मोठे बॉक्‍सवेलची उभारणी होणार आहे. याखेरीज कसाल हायस्कूल येथे फूट ओव्हर ब्रीज उभारला जाणार आहे. कणकवली उड्डाणपूल जोड रस्त्याचाही भाग काढून तेथे नव्याने बांधकाम केले जाणार आहे. याखेरीज महामार्गावर ज्‍या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे, तेथे अपघात होऊ नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याची माहिती राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांनी दिली.

महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभाग, महामार्ग पोलिस, आरटीओ, दिलीप बिल्‍डकॉन, विशाल कन्स्ट्रक्‍शन आदी प्रतिनिधींची बैठक आज सावंतवाडीत झाली. महामार्गावरील सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा आणि महामार्ग दुरुस्तीची कामे तातडीने व्हावीत, अपघातप्रवण क्षेत्रे कमी व्हावीत, यासाठी आज संयुक्‍त बैठक घेतल्‍याचे श्री. खटी म्‍हणाले.

मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चार नव्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात बांदा आणि नेमळे येथील नवीन पुलांच्या निविदा काढण्यात आल्‍या आहेत. इन्सुली फाटा आणि सटमटवाडी येथे मोठे अंडरपास बांधले जाणार आहेत. या कामांनाही केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. पावसाळा संपताच या कामांना सुरुवात होणार आहे.

कसाल येथे नागरिक, तसेच शाळातील मुलांना महामार्ग ओलांडताना खूप समस्यांना सामना करावा लागतो. त्‍यामुळे हायस्कूल परिसरात फूटओव्हर. ब्रीज होणार आहे. त्‍याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. हा पूलही पावसाळ्यानंतर उभारला जाणार आहे. महामार्गावर कुठेही पाणी साचून राहू नये. डांबरी रस्त्यावर जेथे जेथे खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजविले जावेत. ज्‍या ठिकाणी पथदीप बंद आहेत, ते तातडीने सुरू केले जावेत आदीच्या सूचनाही दिलीप बिल्‍डकॉनला दिल्‍या असल्‍याचे श्री. खटी म्‍हणाले.

कणकवली उड्डाणपूल दुरुस्त होणार
कणकवली शहरातील उड्डाणपूल जोड रस्ता गेली दोन वर्षे पावसाळ्यात खचला. आता पावसाळा संपल्‍यानंतर जोडरस्त्याचा खचलेला भाग पूर्णत: काढून तेथे नवीन बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्‍या कालावधीत वाहतुकीचे नियोजनही लवकरच केले जाणार असल्‍याची माहिती श्री. खटी यांनी दिली.

अनधिकृत मिडलकट बंदसाठी पुन्हा मोहीम
यापूर्वी झाराप ते कणकवलीपर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलकट बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. यात चार अनधिकृत मिडलकट बंद करण्यात आले. मात्र, त्‍यानंतर स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध झाल्‍याने हे काम थांबविण्यात आले. आता पोलिस बंदोबस्तात पुन्हा अनधिकृत मिडलकट बंद करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78986 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..