
कणकवलीत ६० वाड्या जोखिमग्रस्त
कणकवलीत ६० वाड्या जोखिमग्रस्त
लेप्टोबाबत सतर्कता; आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० ः तालुक्यात संभाव्य लेप्टोस्पायरोसीसचा धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यातील ६० वाड्या जोखीमग्रस्त निश्चित करुन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्व वाड्यांमध्ये तापसरीचे सर्वेक्षण केले जात आहे. येथील नागरिकांना डॉक्सिसायक्लीनच्या गोळ्याही वितरीत केल्या जात आहेत.
तालुक्यात दरवर्षी लेप्टोस्पायरोसीस तापसरी डोके वर काढते. लावणीची कामे आटोपल्यानंतर तसेच भात कापणीच्यावेळी लेप्टो तापसरीचे रूग्ण वाढतात. या तापसरीमध्ये उपचारात हयगय झाली तर रूग्ण दगावण्याचा धोका असतो. या आधी तालुक्यात अशा साथीने थैमान घातल्याचे उदाहरणे आहेत.
त्यामुळे कणकवली आरोग्य विभागाने लेप्टोस्पायरोसीस तापसरीबाबत सतर्कता ठेवली आहे. तालुक्यात ६० वाड्या जोखीमग्रस्त म्हणून निश्चित केल्या आहेत. जोखीमग्रस्त गावांमधील नागवेमध्ये १ वाडी, हरकुळ खुर्द १, लोरे नंबर १ मध्ये १ वाडी, घोणसरी १ वाडी, फोंडाघाट ३, सांगवे मध्ये ३, शास्त्रीनगर १, शिवाजीनगर १, हरकुळ बुद्रुक ३, हुंबरणे १, वरवडे ३, कलमठ १२, जानवली ४, शिरवल ३, ओसरगाव १, बोर्डवे १, शिवडाव १, भोगनाथ १, वागदे २, हळवल १, नांदगाव १, कोळोशी १, डांमरे १, तरंदळे ४, साकेडी २, हुंबरट २, वाघेरी २, दाबगाव १, आवळेश्वर मधील १ अशा एकूण ६० वाड्यांचा समावेश आहे. या गावातील एकूण ४ हजार २९६ व्यक्तींना ८ हजार ५९२ गोळ्यांचे वाटप केले आहे.
आठवड्यातून एक दिवशी दोन गोळ्या या जोखीमग्रस्त गाव, वाड्यांमधील १४ वर्षावरील नागरिकांनी घ्यायच्या आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आठवड्यातून एक दिवस असे सहा आठवडे या गोळ्यांचा डोस जोखीमग्रस्त गावांमध्ये नागरिकांना देण्यात येत आहे. तापसरीची कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असेही आवाहन आरोग्य पथकाकडून केले जात आहे.
जंगली आणि पाळीव जनावरांमध्ये असणाऱ्या लेप्टो विषाणू मानवी शरीरात गेल्यानंतर लेप्टोचा फैलाव होतो. ताप, अंगदुखी आदी तापसरीची लक्षणे आहेत. आठवड्यापेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास फुप्फुस, मूत्रपिंड यांच्यावर लेप्टोचा हल्ला होत असल्याने रूग्ण दगावण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कणकवली आरोग्य विभागाने यंदा १ जुलैपासूनच लेप्टो तापसरीचे सर्वेक्षण सुरू केले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय जोखीमग्रस्त वाड्याही निश्चित केली आहे. या वाड्यांमध्ये सध्या डॉक्सिसायक्लीन गोळ्यांचे वाटप सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
लेप्टो ची साथ पसरू नये व यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये या दृष्टीने आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय योजना म्हणून व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून या गोळ्यांचे वाटप केले जात असल्याचेही तालुका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
------------------
चौकट
अशा ठरल्या जोखीमग्रस्त वाड्या
मागील तीन वर्षात लेप्टोस्पायरोसिसची साथजन्य स्थिती उद्भवलेली गावे व त्यामधील वाड्या या जोखीमग्रस्तमध्ये घेण्यात आली आहेत. अशा गावांमधूनच या गोळ्यांचे वाटप केले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
------------
कोट
कणकवली तालुक्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने लेप्टोचे रूग्ण आढळले होते. त्यामुळे यंदाही तालुक्यातील प्रत्येक वाड्यांमध्ये सर्वेक्षण केले असून जोखीमग्रस्त वाड्या निश्चित केल्या आहेत. त्या वाड्यांमधील १४ वर्षांपुढील सर्व नागरिकांना डॉक्सिसायक्लीनच्या गोळ्याही वाटप केल्या जात आहेत. त्यामुळे तापसरीच्या रूग्णांनी कुठलाही ताप असेल तर हयगय करू नये. लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून घ्यावेत. सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये लॅप्टोची चाचणी केली जात आहे.
- डॉ. संजय पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79070 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..