
देवरूख ः विनयभंगप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा
विनयभंगप्रकरणी तरुणाला २ वर्षे सश्रम कारावास
न्यायालयाचा निकाल; तपास ६ दिवसांत, संगमेश्वर पोलिसांची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २० ः संगमेश्वर तालुक्यातील तुरळमधील एका तरुणाला विनयभंग प्रकरणी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देवरूख न्यायालयाने सुनावली आहे. दीपक शांताराम हरेकर (रा. तुरळ हरेकरवाडी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
दीपक याने फिर्यादी यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीतील कौले काढून घरामध्ये येऊन विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली होती. यावरून दीपक हरेकर याच्यावर २४ मार्च २०२२ ला गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा अतिसंवेदनशील व महिलाविषयक गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांचे तपासपथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास २४ मार्च २०२२ पासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ६ दिवसांत पूर्ण करून आरोपी याच्याविरुद्ध पुरावे गोळा करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलिस फौजदार कांबळे तपासिक, पोलिसनाईक सचिन कामेरकर, पोलिस कॉन्स्टेबल खोंदल तर पैरवी अधिकारी म्हणून लांडगे यांच्यासह सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एस. आर. वनकर यांनी कामकाज पाहिले.
---------------
चौकट
गुन्हा फास्ट ट्रॅकवर..
न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग देवरूखचे न्यायाधीश तारे यांनी सदरचा गुन्हा हा फास्ट ट्रॅकवर चालवून ४ महिन्याच्या आत या गुन्ह्यातील आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३५४ करिता १ वर्षे सश्रम कारावास व १५०० रु. दंड. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भारतीय दंड विधान कलम ४५२ साठी १ वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावलेली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79254 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..