
मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
नांदगाव - ओझर येथील पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एकाचा पाय घसरून नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. शरफुद्दीन मोहम्मद बटवाले (वय ५२, रा. नांदगाव मुस्लिमवाडी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (ता. १९) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदगाव तिठा येथून शरफुद्दीन आपल्या मेहुणीचा पती हनिफ अहमदअली थोडगे (मूळ रा. गगनबावडा, सध्या रा. नांदगाव) यांच्याबरोबर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ओझर येथील पियाळी नदीवर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करताना शरफुद्दीन यांचा पाय घसरल्याने ते नदीत कोसळले.
हा प्रकार त्यांच्यासोबत असलेले हनिफ थोडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले व रिक्षाने नांदगाव आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शरफुद्दीन बटवाले यांचे नांदगाव तिठा येथे गेली अनेक वर्षे चहा, नाष्ट्याचे हॉटेल आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. हवालदार चंद्रकांत झोरे तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79322 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..