
ओबीसी आरक्षणात 'महाविकास आघाडी'चा सिंहाचा वाटा - अमित सामंत
कुडाळ - ओबीसी आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय असून यात महाविकास आघाडीचा सिंहाचा वाटा आहे, असे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. तर जिल्हा प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण हा दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय स्वागतार्ह असून, आम्हाला राजकीय २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. अन्य सुविधांसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आज येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात श्री. सामंत व श्री. कुडाळकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हाध्यक्ष श्री. सामंत यांनी, कोणत्याही राजकीय श्रेयवादात न जाता गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार कार्यरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडीचा यात सिंहाचा वाटा आहे, असे सांगितले.
श्री. कुडाळकर म्हणाले की, ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण आज अखेर मिळालेले आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे ऋण व्यक्त करतो. या सर्व प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसींसाठी लढा देणारे छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ओबीसी सेलचे प्रमुख ईश्वर बाळभुते या सर्वांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या मागे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बाराबलुतेदार असणाऱ्या ओबीसींच्या मागे ठामपणे उभे राहिले. २७ टक्के राजकीय आरक्षण हा मुद्दा पूर्ण झाला असला, तरी इतर मागण्याही आहेत. शैक्षणिक क्षेत्रात मुलांना त्रास होऊ नये, म्हणून जास्त आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आमची लढाई सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे जिल्ह्यात ओबीसी सेल कार्यरत राहणार आहे.
भविष्यात राजकीय क्षेत्रात विविध निवडणुकांच्या माध्यमातून विधायक पावले टाकली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर, शिवाजी घोगळे, नीलेश गोवेकर, अनंत पिळणकर, नझीम शेख, उत्तम सराफदार, साबा पाटकर, प्रतीक सावंत, देवेंद्र पिळणकर, राजू सुतार आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79435 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..