
रत्नागिरी-घरोघरी तिरंगा नियोजनासाठी ग्रामसभा
घरोघरी तिरंगा नियोजनासाठी ग्रामसभा
रत्नागिरी, ता. २४ ः भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असून, घरोघरी तिरंगा, जलजीवन मिशन व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत जनजागृतीसाठी २५ ते २९ जुलैदरम्यान ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात यावा. घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून, या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचा उपक्रम यशस्वी करून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ग्रामसभांबरोबरच महिला तसेच बालसभा घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सभाही त्या कालावधीत होणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत जि. प. तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑगस्टपर्यंत हे कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये वक्तृत्व, निबंध, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धांचे आयोजन, गावातून प्रभातफेरी, तिरंगा संमेलन, गटशिक्षणाधिकारी चर्चासत्र, केंद्रप्रमुख चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79549 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..