
खेड ः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
बालिकेवर अत्याचार; आरोपीला २० वर्ष सक्तमजुरी
खेड न्यायालयाचा निकाल; २५ हजाराचा दंड, रकम पीडितेला देण्याचे आदेश
खेड, ता. २१ ः तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधम रोशन रामचंद्र खेराडे याला खेड न्यायालयाने गुरुवारी (ता. २१) २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१५ सप्टेंबर २०२०ला आरोपी रोशन खेराडे याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम २०१२ चे कलम ३ ब ३ क, ५ एम/६, ७/८११/१२ प्रमाणे खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोशन रामचंद्र खेराडे याच्या विरोधात खेड न्यायालयात खटला चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. सदर प्रकरणी सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार व्ही. एम. आडकूर, खेड पोलिस निरीक्षक निशा जाधव, कोर्ट पैरवी आलीम शेख आणि अजय इदाते यांचे सहकार्य लाभले. गुरुवारी (ता. २१) अतिरिक्त सत्र न्यायालय-२ चे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी भादंवि कलम ३७६- ए आणि बी या कलमाखाली २० वर्ष सश्रम कारावास आणि अडीच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधी कारावासाची शिक्षा, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम २०१२ चे कलम ३ ब ३ क-२० वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षाचा साधा कारावास, कलम ५ एम/६ अन्वये २० वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन वर्षाचा साधा कारावास, तसेच कलम ७/८- ५ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार इतका दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा साधा कारावास, कलम ०९/१० अन्वये ५ वर्षाचा सश्रम कारावास आणि अडीच हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास, कलम ११/१२ अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजाराचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावासाची अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एकूण रक्कम २५ हजार रुपये पीडितेला देण्याबाबत आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79636 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..