पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी
पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी

पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी ...................लोगो

फोटो ओळी
-rat२२p४.jpg ः साने गुरूजी
-rat२२p५.jpg
३७७८०
साने गुरुजी
३७७८१
प्रकाश देशपांडे
-------------------

पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी

मातेचे महन्मंगल स्तोत्र गाणारे आणि मनानेही मातृहृदयी असलेले पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी यांचे वाङमय हे मराठी भाषेच्या देहावरील अभूतपूर्व लेणे आहे. गुरूजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ला दापोली तालुक्यातील पालगड येथे झाला. आर्इ-वडील त्यांना पंढरी म्हणत. वडील सदाशिव तथा भाऊराव पालगडजवळच असलेल्या वडवली गावाचे खोत होते. पूर्वी ऐश्‍वर्यसंपन्न असलेल्या घराची स्थिती नंतरच्या काळात हरपली आणि दारिद्र्य आले. त्यामुळेच वडील अस्वस्थ असत. गुरूजींच्या आर्इचे नाव यशोदा; पण सगळे बयो म्हणत. आर्इनेच त्यांच्या मनोबुद्धीची काळजी घेऊन घडवले.
पालगडला पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे गेले. तिथून औंधला आणि पुन्हा पुण्याला अशी त्रिस्थळी यात्रा करत होते. त्यातच त्यांच्या आर्इचे निधन झाले. आर्इच्या मरणाचा त्यांना जबरदस्त धक्का बसला. आर्इ ही त्यांच्यासाठी कल्पतरू होती. हळूहळू त्यातून सावरले; मात्र त्यानंतर त्यांच्या मनात जागी झाली ती वात्सल्यभक्ती! हीच भक्ती त्यांच्या आयुष्याला वेगळा आकार देऊन गेली.
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते न्यू पुना कॉलेजमध्ये दाखल झाले. मराठी आणि संस्कृत आवडीचे विषय होते. महाविद्यालयात त्यांना दत्तो वामन पोतदार मराठी शिकवत. इथे त्यांनी टॉलस्टॉय, रवींद्रनाथ, कार्लाइल, कीटस्, शेले, वर्डस्वर्थ आदी कवी आणि तत्त्वज्ञांच्या वाङमयाचा अभ्यास केला. पुढे बीए झाले. त्यांना कुठेही शिक्षक म्हणून नोकरी मिळाली असती; पण अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना ''निर्वाहवेतन देऊन शिक्षण देणार'' असल्याची जाहिरात वाचून तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गुरूजी अंमळनेरला गेले; मात्र तिथे रमले नाहीत. कारण, ज्यांनी हे तत्त्वज्ञान मंदिर काढले होते त्यांच्या वर्तनातील विरोधाभास त्यांना पटला नाही. याच काळात ते एमए झाले. प्राध्यापक म्हणून मुंबर्इला जायचा विचार असतानाच अंमळनेरच्या हायस्कूलमधे शिक्षक झाले. शाळेचे वसतिगृह होते. गुरूजी वसतिगृहाचे चालक म्हणूनही काम करू लागले; मात्र अंर्तमनात देशाच्या पारतंत्र्याच्या व्यथा अस्वस्थ करत होत्या आणि एक दिवस शाळेतील नोकरी सोडून गुरूजी देशकायार्थ बाहेर पडले. संपूर्ण खानदेशात त्यांनी सभा घ्यायला सुरवात केली. अखेर १७ मे १९३०ला त्यांना अटक झाली. पंधरा महिने कारावासाची शिक्षा होऊन धुळ्याच्या कारागृहात नेण्यात आले. तिथून ''धोकादायक कैदी'' म्हणून चित्रनापल्ली येथे नेण्यात आले. तुरूंगात त्यानी भंगीकाम केले. देशभरातून विविध भाषा बोलणारे कैदी आले होते. तिथेच त्यांना आंतरभारतीची कल्पना सुचली.
कारागृहातून सुटका होताच गुरूजींनी पुन्हा खानदेशचा रस्ता धरला. पुन्हा सभा सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा धुळ्याच्या तुरूंगात रवानगी झाली. तिथे त्यांच्याबरोबर आचार्य विनोबाजी होते. तुरूंगातल्या कैद्यांसमोर आचार्य विनोबाजींनी गीतेवर प्रवचने दिली. गुरूजींनी ती अक्षरबद्ध केली आणि १९३२ला ''गीतार्इ'' ही अजरामर समश्‍लोकी जन्माला आली. गीतार्इच्या आजवर जवळपास ३०० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. याचे श्रेय साने गुरूजींना आहे. धुळ्याच्या तुरूंगातून गुरूजींना नाशिक कारागृहात हलवले. याच तुरूंगात ९ फेब्रुवारी १९३३ ते १३ फेब्रुवारी १९३३ या चार दिवसात गुरूजींच्या हातून मातेचे मंगलमय स्तोत्र ''श्यामची आर्इ'' जन्मले. ''श्यामची आर्इ'' या ग्रंथाच्या आजवर विविध भाषेत २५ लाख प्रतींची विक्री झाली आहे. हा मराठी ग्रंथजगतातला विक्रीचा उच्चांक आहे.
१९३६ ला फैजपूरला कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन झाले. खानदेशातले फैजपूर गुरूजींनी अथक प्रयत्न करून अधिवेशन यशस्वी केले. १९४२ ला असहकार आंदोलन सुरू झाले. या वेळी गुरूजींनी भूमिगत राहून इंग्रज सरकारविरुद्ध रान पेटवले. पुन्हा तुरूंगवास! गुरूजींनी आयुष्यातली आठ वर्षे वेगवेगळ्या तुरूंगात काढली.
१९४६ ला गुरूजींनी एक महानकार्य सिद्धीला नेले. वारकरी आणि संतश्रेष्ठांचा विठ्ठल सर्वांना मुक्त केला. यासाठी त्यांनी उपोषण केले. समाजजागृती केली. १९४७ ला देश स्वतंत्र झाला आणि १९४८ ला महात्माजींची हत्या झाली. गुरूजी या धक्क्याने अस्वस्थ झाले. अखेर ११ जून १९५० ला झोपेच्या गोळ्या घेऊन वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शंभरहून अधिक पुस्तके, साधना साप्ताहिक, आंतरभारती त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून आजही मार्ग दाखवत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79787 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top