
वैभववाडी पंचायत समिती अजूनही अपूर्णच
37788
वैभववाडी ः येथील पंचायत समितीची इमारत.
वैभववाडी पं.स. इमारत अपूर्णच
तीन कोटीचा खर्च; आणखी हवेत दीड कोटी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः गेली आठ वर्ष सुरू असलेल्या बहुचर्चित आणि निकृष्ट कामांचा ठपका बसलेल्या वैभववाडी पंचायत समितीवर आतापर्यत ३ कोटी रूपये खर्च झाले असून परिपुर्ण इमारत आणि परिसर सुशोभीकरणांसाठी अजूनही अंदाजे दीड कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. त्यामुळे या इमारतीला निधी कधी मिळणार? उद्घाटन कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैभववाडी पंचायत समितीचा कारभार तुटपुंज्या जागेत सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी २०१३ मध्ये वैभववाडी पंचायत समिती इमारतीसाठी २ कोटी ५४ लाखांचा निधी मंजुर करून दिला. या इमारतीचे भुमिपुजन देखील २०१४ मध्ये त्यांच्याच हस्ते झाले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. परंतु, प्राथमिक स्तरापासूनच या इमारतीच्या कामाच्या दर्जावर आक्षेप येण्यास सुरूवात झाली. या इमारतीचे स्लॅब तब्बल अति मुसळधार पाऊस सुरू असताना झाल्यामुळे इमारतीची चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर सातत्याने ही इमारत निकृष्ट कामामुळे चर्चेत आली. काही वेळा इमारतीचे उभारलेले खांब देखील तोडण्यात आले. अडीच तीन वर्षानंतर इमारतीचे काम पूर्ण झाले. परंतु, पहिल्याच वर्षी इमारतीला गळती सुरू झाली. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना केल्या. गुणनियत्रंक विभागाने इमारतीच्या दर्जाबाबत कोणताही आक्षेप न घेता थेट इमारतीची गळती रोखण्यासाठी छप्परांचा पर्याय सुचविला. इमारती संदर्भात प्रसिध्द माध्यमांनी टिकेची झोड उठविली तर काही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यानी आंदोलने देखील छेडली. आत्ताचे पालकमंत्री यांनी छप्परांसाठी लागणारा निधी नियोजन समितीतून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ३७ लाखांचा निधी दिला. त्यातून आता या इमारतीवर छप्पर घालण्यात आले आहे. आतापर्यत या इमारतीवर ३ कोटी २० लाख रूपये खर्च झाला आहे. त्यातील २ कोटी ९१ लाख रूपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. झालेल्या कामांपैकी ३० लाख रूपये ठेकेदाराला देणे बाकी आहे. निधी नसल्यामुळे ही रक्कम आतापर्यत ठेकेदाराला देण्यात आलेली नाही. परंतु, अजुनही या इमारतीमधील कित्येक कामे शिल्लक आहेत. इमारतीमधील इलेक्ट्रीकचे काम शिल्लक आहे. पाण्याची कोणतीही सुविधा इमारतीत नाही. याशिवाय इमारती सभोवताली संरक्षक भिंत, ट्रॉन्सफार्मर, इमारतीला आवश्यक फर्निचर या कामांसाठी अंदाजे दीड कोटी रूपयांचा निधी आवश्यक आहे. या कामांचा प्रस्ताव तयार कऱण्याचे काम सध्या जिल्हा परिषद बांधकाम विभागांकडून सुरू आहे. त्यामुळे ही कामे नेमकी होणार कधी? आणि या बहुचर्चित इमारतीचे उद्घाटन होणार कधी? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.
----------
चौकट
ऑगस्टमध्ये उद्घाटन होणार?
आमदार नितेश राणे यांनी पंचायत समिती इमारतीमधील शिल्लक कामे तातडीने पूर्ण करा. २० ऑगस्टनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उद्घाटनांची तारीख निश्चित करणार असल्याचे आढावा सभेत स्पष्ट केले होते. त्यामुळे ही सर्व कामे ऑगस्टपर्यत पूर्ण होतील का? आणि त्यानंतर त्या इमारतीचे उद्घाटन होईल याची चर्चा सध्या सुरू आहे.
----------
कोट
पंचायत समिती इमारतीचे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय संरक्षक भिंत, ट्रान्सफार्मर यासह विविध कामांचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यासाठी अंदाजे एक ते दीड कोटीचा निधी अपेक्षित आहे. येत्या दोन चार दिवसात हा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. आतापर्यंत या इमारतीचे ३ कोटी २१ लाखांचे काम झाले असून ठेकेदाराला २ कोटी ९१ लाख रूपये अदा केली आहे.
- आर. पी. सुतार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग
------------
कोट
इमारतीच्या छप्पराचे काम पुर्ण झाले असून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. परिसर सुशोभिकरणाच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या बांधकाम विभागाकडून सुरू आहे.
- जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79795 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..