अनिष्ट विधवा प्रथा निर्मुलनसाठी कंबर कसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ban Widow Rituals
विधवा प्रथा हटविण्यासाठी कंबर कसली

अनिष्ट विधवा प्रथा निर्मुलनसाठी कंबर कसली

ओरोस - ‘विधवा’ प्रथेच्या निर्मुलन मोहिमेला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ४२१ पैकी ३१९ ग्रामपंचायतीनी हा ठराव घेतला आहे. यात देवगड, कणकवली, कुडाळ व मालवण तालुक्याचे १०० टक्के ठराव झाले असून त्या तुलनेत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तीन तालुक्यांत मात्र अनुत्सुकता दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ५ मे २०२२ ला ग्रामसभा घेत समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला. हा ठराव म्हणजे महाराष्ट्र राज्यात मोठा सामाजिक बदल ठरल्याने त्याची सर्वत्र चांगली चर्चा झाली होती. राज्य शासनाला हेरवाड ग्रामपंचायतीचा हा ठराव राज्यासाठी मार्गदर्शक वाटल्याने शासनाने अशाप्रकारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी ग्रामसभेत ठराव घेवून शासनाला माहिती देण्याचे आदेश दिले होते.

आपण विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून सध्या वाटचाल करीत आहोत. तरीही आपण अनिष्ट विधवा प्रथांचे पालन करीत आहोत. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणार, या सारख्या प्रथांचे पालन अजूनही केले जात आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून वावरत असताना समाजाकडून अवहेलनेस सामोरे जावे लागते. त्यानंतर त्या विधवा महिलेला समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे या कुप्रथेचे या विधवा महिला बळी ठरतात. परिणामी या महिलांना प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे खच्चीकरण होते. भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्कांचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे, काळाची गरज होती. या महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने हेरवाड ग्रामपंचायतप्रमाणे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभा घेवून करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांत याला मोठा प्रतिसाद लाभला आहे. हा ठराव घेण्यासाठी असंख्य गावांत खास ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी असंख्य ग्रामपंचायतींनी एकमुखी तर काही ठिकाणी बहुमताने हा ठराव घेण्यात आला आहे. १०० टक्के ठराव घेण्याचा मान सर्वप्रथम कणकवली तालुक्याने मिळविला होता. त्यानंतर देवगड, कुडाळ व मालवण या तालुक्यांनी १०० टक्के ठराव घेतले आहेत. परंतु, सावंतवाडी तालुक्यात १९, दोडामार्ग तालुक्यात एक व वेंगुर्ले तालुक्यात दोन एवढे कमी ठराव झाले आहेत. वैभववाडी तालुक्यात केवळ पाच ग्रामपंचायतीचे ठराव झालेले नाहीत.

अनिष्ट विधवा प्रथा बंद ठरावाला जिल्ह्यातील ग्रामसभांचा चांगला प्रतिसाद लाभला. केवळ सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तीन तालुक्यांत विधवा अनिष्ट प्रथा बंदचे ठराव मोठ्या संख्येने झालेले नाहीत. १५ ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत हे ठराव या तिन्ही तालुक्यांत घेतले जातील.

- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

प्रथा बंद ठराव तालुकास्थिती

तालुका एकूण संख्या मंजूर ठराव

देवगड ७२ ७२

वैभववाडी ३४ २९

कणकवली ६३ ६३

मालवण ६५ ६५

कुडाळ ६८ ६८

सावंतवाडी ६३ १९

दोडामार्ग ३६ १

वेंगुर्ले ३० २

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79797 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :oroswidowEfforts