
टुडे पान एक-मडुऱ्याचा विज प्रश्न सुटणार कधी?
37839
रोणापाल ः वीज अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सरपंच सुरेश गावडे. सोबत अधिकारी.
मडुऱ्यातील वीजेचा प्रश्न
तातडीने सोडवा ः सरपंच
अधिकाऱ्यांकडून समस्यांची दखल
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार उद्भवणारी वीज समस्या अजूनही कायमच आहे. लेखी निवेदने, उपोषण, घेराव घालूनही महावितरणला जाग येत नसल्याने मडुरा पंचक्रोशीतील ग्राहक हतबल झाले असून वीज समस्या कधी मार्गी लावणार, असे सांगत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी महावितरणच्या कामावर अधिकाऱ्यांसमोरच ताशेरे ओढले. दरम्यान, गणेशोत्सवाआधी मडुरा पंचक्रोशीसह आरोस परिसरातील वीज समस्या कायमची मार्गी लावू, अशी ग्वाही अधीक्षक अभियंता श्री. विपर यांनी सरपंच गावडेंना दिली.
रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत अधीक्षक अभियंता श्री. विपर बोलत होते. यावेळी अतिरिक्त अभियंता श्री. मिसाळ, उपअभियंता श्री. भुरे, शाखा अभियंता श्री. यादव, लाईन स्टाफ श्री. सपकाळे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब उपस्थित होते. दांडेली मार्गे डोंगरातून मळेवाड सबस्टेशन येथे जाणारी लाईन अद्ययावत करणे, सातार्डा लाईन अद्ययावत करणे, आरोस फीडरवरून जाणाऱ्या सर्व लाईनवरील झाडे तोडून सफाई करणे, फीडरवरील सर्व गावांतील एलटी लाईनवर आलेली झाडे तोडून अद्ययावत करणे, कामगार वाढविणे तसेच प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन काम लवकर पूर्ण होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे विपर यांनी सांगितले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने वीज अधिकाऱ्यांच्या आश्वासनांवर निर्भर न राहाता नेमक्या समस्या कधी मार्गी लावणार? असा प्रश्न सुरेश गावडे यांनी केला.
--------
दक्षतेच्या सूचना
गतवर्षी ऐन गणेशोत्सवातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. याचा फटका मूर्तीकारांना बसला. त्यामुळे गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती यंदाही होऊ नये, असे निर्देश गावडेंनी अधिकाऱ्यांना दिले. नळयोजना विजेअभावी जास्त वेळ बंद राहणार नाहीत, यासाठी सरपंचांना समाविष्ट करून एक ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती पुरवण्यात येणार आहे. सार्वजनिक व वैयक्तिक थांबलेली कामे मार्गी लावू, असे विपर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79848 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..