चिपळूण ः जीएसटीच्या विरोधात विरोधी पक्ष जनतेतून उठाव होणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः जीएसटीच्या विरोधात विरोधी पक्ष जनतेतून उठाव होणे गरजेचे
चिपळूण ः जीएसटीच्या विरोधात विरोधी पक्ष जनतेतून उठाव होणे गरजेचे

चिपळूण ः जीएसटीच्या विरोधात विरोधी पक्ष जनतेतून उठाव होणे गरजेचे

sakal_logo
By

38452 ः संग्रहीत
................
जीएसटीविरोधात जनतेने उठाव करावा

चिपळुणातील नागरिक संतप्त; पाच टक्के जीएसटीचा फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः अनब्रँडेड, प्री-पॅक, प्री-लेबल अन्नधान्य, डाळी, खाद्यपदार्थांवरील ५ टक्के जीएसटीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यांचे जगणे आणखी महाग होणार आहे. महिन्याचे बजेटच बिघडणार आहे. महागाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे हा कर मागे घ्यायला लावण्यासाठी जनता आणि राजकीय पक्षांकडून उठाव होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूणमध्ये उमटत आहेत.
अन्नधान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लावून केंद्रातील भाजप सरकारने सामान्य जनतेचा विश्‍वासघात केलेला आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्येच मोदी सरकारने हा तुघलकी निर्णय घेतला, हे दुर्दैवी आहे. जीएसटी हा सर्वसामान्यांसाठी गब्बरसिंग टॅक्स आहे. अन्नधान्य, खाद्यपदार्थावरील जीएसटी विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल. अन्नधान्यावरील कराविरोधात जनतेतून उठाव होणे गरजेचे आहे, असे मत कॉंग्रेसचे शहरप्रमुख लियाकत शाह यांनी व्यक्त केली.
अनब्रॅंडेड प्री-पॅक, प्री-लेबल अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचा नाही. तो निर्णय जीएसटी कौन्सिलचा आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री असतात. सर्वांच्या संमतीने निर्णय होत असतात. यापूर्वी ब्रँडेड अन्नधान्यावर जीएसटी होता; पण काही बड्या कंपन्या मखलाशी करत होत्या. त्यामुळे अनब्रँडेडवरही ५ टक्के जीएसटी लावला असावा, असे मत भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे यांनी व्यक्त केले.
देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत ७५ वर्षांत अन्नधान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थ या जीवनावश्यक वस्तूंवर कधीही कर लावला नव्हता; पण केंद्र सरकारने प्रथमच हा कर लावला आहे. या करामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत. त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर मागे घ्यायला लावण्यासाठी जनतेने संघटित ताकद दाखवून देणे गरजेचे आहे, असे मनसेचे माजी तालुकाप्रमुख संतोष नलावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, महागाई वाढलेली आहे. घरगुती गॅस आता परवडत नाही. त्यामुळे लोक पुन्हा चुलीकडे वळत आहे. आता तर केंद्राने अन्नधान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावून महागाईत पुन्हा भर टाकली आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. हा कर लोकांना मोडून काढणारा आहे. मोठ्या उद्योगपतींना सूट देणे, त्यांची मोठी कर्जे माफ करणे सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य लोकांवर टॅक्स लावला जात आहे. या विरोधात जनतेने पेटून उठणे गरजेचे आहे.
--------
चौकट
केंद्र सरकारचा खरा चेहरा आला समोर
पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले होते. जनतेच्या हिताचा आव आणत असल्याचा आविर्भाव त्यामागे होता; मात्र केंद्र सरकारने अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थांनाही ५ टक्के जीएसटी लावून आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील या करामुळे जनतेची लूट होणार आहे. श्रीलंकेसारखा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत अलोरेचे रमेश पाटील यांनी व्यक्त केले.
..
चौकट
केंद्राला गाशा गुंडाळायला लावेल
इतिहास हा बोध घेण्यासाठी असतो. ब्रिटिशांनी मिठावर टॅक्स लावला होता, त्या विरोधात दांडीयात्रा निघाली व अनेक ठिकाणी आंदोलन झाले. मिठावरील कराविरोधात सारा देश ढवळून निघाला. त्यामुळे ब्रिटिशांना देशातून पळून जावे लागले. आता केंद्र सरकारने भाकरीवर टॅक्स लावला आहे. भाकरीवरील हा टॅक्स केंद्र सरकारला गाशा गुंडाळायला लावेल; मात्र त्यासाठी सध्या देशाला एका गांधीजींची गरज आहे, असे मत चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती विजय गुजर यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80597 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..