
रत्नागिरी- ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांना पुरस्कार
rat२५p३५.jpg
38469
- मुंबई : रंगकर्मी सुहास भोळे यांना प्रा. मधुकर तोरडमल चतुरस्र पुरस्कार देताना बाळ धुरी.
.........
ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांना
प्रा. मधुकर तोरडमल पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, ता. २५ : मुंबई मराठी साहित्य संघाच्या अक्षर साहित्य दालनामध्ये प्रा. मधुकर तोरडमल उर्फ मामाच्या जयंतीनिमित्त पाचवा चतुरस्त्र पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रत्नागिरीचे ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांना हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. पाच हजार रुपये, मानपत्र आणि भेटवस्तू असे याचे स्वरूप होते.
याप्रसंगी सत्काराला उत्तर सुहास भोळे म्हणाले की, कलावंतांची गरज त्या कलावंताला चतुरस्त्र बनवत जाते. यशाचे श्रेय त्यांनी माता-पिता, पत्नी आकांक्षा, कन्या अक्षता, जिज्ञासा आणि सर्व सहकारी कलावंतांना दिले. आयोजकांच्या विनंतीनुसार सुहास भोळे यांनी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या काळे बेट लाल बत्ती या नाटकातील एक स्वगत रसिकांसमोर सादर केले.
प्रमुख पाहुणे बाळ धुरी यांनी सुहास भोळे यांचे कौतुक करताना आपल्या चतुरस्त्रपणाचा पुरावा आपल्यासमोर सादर केल्याचे रसिकांना सांगितले आणि योग्य व्यक्तीला हा मानाचा चतुरस्त्र पुरस्कार देण्यात आल्याचे समाधान व्यक्त केले. मामांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित अभिनय स्पर्धा तसेच वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचे पारितोषिक वितरण या वेळी करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अभिनेते उपेंद्र दाते, संध्या वेलणकर-ओक, सुभाष भागवत, तसेच मामांच्या कन्यका शर्मिला माहुरकर आणि तृप्ती तोरडमल उपस्थित होत्या. विशाख म्हामणकर यांनी सूत्रसंचालन केले. उपेंद्र दाते यांनी आभार मानले. पुढील वर्षी प्राध्यापक मधुकर तोरणमल यांच्या ''तरुण तुर्क म्हातारे अर्क'' या नाटकातील उताऱ्यांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात येईल, असे आयोजकांनी जाहीर केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80652 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..