
''पीक विमा''च्या प्रचारासाठी चित्ररथ
swt२६११.jpg
38672
सिंधुदुर्गनगरीः पीक विमा प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या चित्ररथांसोबत निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर, अरुण नातू व अन्य.
‘पीक विमा’च्या प्रचारासाठी चित्ररथ
ऑडियो क्लिपद्वारे माहितीः जिल्ह्यातील विविध भागात करणार जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ः खरीप हंगाम पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी विमा कंपनीचे दोन कृषी चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ३१ पर्यंत हे चित्ररथ जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना ऑडियो क्लिपद्वारे पीक विम्याची माहिती देणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी या दोन्ही कृषीरथांना हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर, जिल्हा सल्लागार अरुण नातू, विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयक करिश्मा धनराज, कृषी विभागाचे अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील भात आणि नागली या दोन पिकांचा समावेश शासनाने केला आहे. यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती सिंधुदुर्गसाठी करण्यात आली असून ३१ पर्यंत हप्ता भरण्याचे आवाहन केले आहे.
भात पिकासाठी प्रति हेक्टरी १०३५.२० रुपये, तर नागली पिकासाठी ४०० रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता निश्चित केला आहे. या योजनेची प्रचार-प्रसिध्दी व्हावी व जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावेत, यासाठी विमा कंपनीने दोन चित्ररथ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठविले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी त्यांना हिरवा झेंडा दाखवला असून, २५ ला वेंगुर्ले, मालवण, २६ ला कुडाळ, देवगड, २७ आणि २९ ला सावंतवाडी, कणकवली, २८ ला दोडामार्ग, वैभववाडी, ३० ला कुडाळ, मालवण, ३१ ला वेंगुर्ले, देवगड या तालुक्यांमध्ये हे चित्ररथ फिरणार आहेत. गतवर्षी या योजनेत जिल्ह्यातील ८१६० शेतकरी सहभागी झाले होते. यापेक्षा जास्त शेतकरी सहभागी व्हावेत, यासाठी विमा प्रतिनिधी आणि जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी मंडळ निहाय ५०० शेतकरी सहभागाचे उद्दिष्ट मंडळ कृषी अधिकारी यांना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी निश्चित करून दिले आहे. आतापर्यंत २२८९ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले पीक विमा संरक्षित करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80924 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..