
कुशल, संयमी नेतृत्व उध्दव ठाकरे
पुरवणी डोकेः कर्मयोद्धा उद्धव ठाकरे वाढदिवस विशेष
कुशल, संयमी नेतृत्व उध्दव ठाकरे
लीड
शिवसेना म्हणजे संघर्ष. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या या संघटनेला विस्तारण्याचे आणि बळ देण्याचे काम या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी आपले कुशल आणि संयमी नेतृत्व सिध्द केलेच पण पक्षाबरोबरच एक मुख्यमंत्री म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक घरात त्या घरचे कुटुंबप्रमुख असल्यासारखे वाटायचे. यावरूनच त्यांच्या कतृत्वाची उंची लक्षात येते. कोकणाने शिवसेनेला आणि शिवसेनेने कोकणाला जिवापाड प्रेम दिले. हेच प्रेम कोकणवासियांकडून ठाकरे यांना मिळाले आणि मिळत राहील.
---------------
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा कधी ना कधी अवतरतच असतो; परंतु राजकीय नेत्यांच्या आयुष्यातील संघर्ष हा त्यांच्या राजकीय भवितव्याचे आणि राजकीय जीवनाचे एक मूल्यमापन करणारा ठरतो. संघर्षात ज्या नेत्यांनी संयम पाळला अशा नेत्यांनी राजकारणात कायम यशस्वी वाटचाल केल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असेच चित्र आहे. संघर्षातही संयमाची कठोर सीमा दाखवणारी व्यक्ती म्हणून उद्धव यांच्याकडे पाहिले जाते.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात जन्म घेतलेले उद्धव ठाकरे हे एका अत्यंत कठोर, कडव्या आणि आक्रमक अशा राजकीय आणि सामाजिक चळवळीच्या इतिहास असणाऱ्या पार्श्वभूमीतून उभे राहिले. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या आक्रमक शैलीतून महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला एक नवा आयाम लाभला. त्यांची भाषा, त्यांची सडेतोड वक्तव्ये, त्यांनी थेट घेतलेल्या भूमिका, यामुळे ठाकरे घराणे हे कायमच चर्चेच्या आणि राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिले. उद्धव ठाकरेंनी या कौटुंबिक वारशाचा आधार घेत राजकारणात पाय ठेवले. पण ठाकरे घराण्यातील तो आक्रमक बाणा आणि थेट भूमिका घेण्याची कला उद्धव यांच्याकडे नाही, असे सतत मानले जात होते. बाळासाहेबांसोबत काम करणार्या अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली; परंतु त्यानंतर अशा बंडखोर नेत्यांची राजकीय आयुष्यातील भरभराट फार काही झाली नाही. ज्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात बंड केले, या सर्वच नेत्यांनी व्यक्तिगत पातळीवर बाळासाहेबांवर कधी टीकाटिपण्णी केली नाही. कायम त्यांना आपले दैवतच मानले त्यांनी. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तसे झाले नाही. सतत व्यक्तिगत टीकेचे त्यांना धनी व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच त्यांच्या निर्णयक्षमतेबाबत आणि राजकीय कौशल्याबाबत कायम शंकाकुशंका घेतल्या गेल्या. आरोप-प्रत्यारोप झाले. एवढेच नाही तर अत्यंत व्यक्तिगत पातळीवर एकेरी भाषेत, अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर काही राजकीय नेत्यांनी टीकाही केली; पण उद्धव ठाकरे हे कधीही डगमगले नाहीत किंवा प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. पक्षबांधणीवरच त्यांनी आपला कटाक्ष ठेवला. खरे तर प्रबोधनकार किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी शैली वा स्वभाव नसला, तरी त्यांचे गुण मात्र उद्धव यांच्यात असल्याचे आता राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय तज्ज्ञांना आणि जाणकारांना वाटत आहे.
राजकारणातील मोठ्या आव्हानांना सडेतोड तोंड देणे आणि भूमिका घेऊन राजकीय भवितव्याची चिंता न करता शिवसेनेची एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणे हे उद्धव ठाकरे यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवलेले सूत्र आहे. मराठी माणूस असो किंवा हिंदुत्व, यावर उद्धव ठाकरे यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. पण त्या सतत मांडून भांडत राहणे किंवा त्यावरच कायम बोलत राहणे हे मात्र त्यांच्या स्वभावात नाही. अत्यंत मितभाषी, संयमी आणि बोर्डरुम पॉलिटिक्स यामध्ये ते उजवे ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.
उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बिनीचे शिलेदार बनले आहेत. भाजपसोबत काम करत असताना मागील पंचवीस वर्षांत त्यांनी स्वतःचे अनुभव घेतले. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन निर्णयदेखील घेतले आहेत. शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व जोपासणे आणि शिवसेनेच्या संघटनेला राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला न बांधता आपले महत्त्व वाढवणे हे राजकारणातील सूत्र उद्धव ठाकरे यांनी आत्मसात केले आहे. कठीण काळातही शिवसेनेचा आत्मा असलेली शाखा पुन्हा जिवंत करणे, सर्वसामान्य शिवसैनिकाला आत्मसन्मान मिळवून देतानाच त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करणे यावर उद्धव यांनी भर दिला. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा चार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा सामना उद्धव यांच्या नेतृत्वाखालीच सेनेने केला. हे करत असताना शिवसेनेचा आत्मसन्मान कायम ठेवत शिवसेना राष्ट्रीय पक्षाची गुलाम संघटना होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली.
२०१९ च्या विधानसभेसाठी भाजपसोबत युती करून शिवसेना निवडणुकीला सामोरी गेली होती. बहुमताचा कौल युतीच्या बाजूने होता, पण २०१४ ते २०१९ च्या दरम्यान भाजपने शिवसेनेला आणि शिवसैनिकांना दिलेली वागणूक पाहता उद्धव यांनी अत्यंत धाडसी असा निर्णय घेत पारंपरिक राजकीय विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संधान बांधले आणि सरकार स्थापन केले. राजकारणातील कुठलेही पद न घेणार्या ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सत्तेची पदे घेतली. प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होऊन आगामी राजकीय दिशा ठरवण्याचा उद्धव यांचा हा निर्णय चर्चेचा ठरला. आता त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी बंड करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले आहे. शिवसेना कठिण काळातून जात आहे. पण हा संघर्ष त्यांना नवा नाही. उध्दव ठाकरे यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय कारकीर्दीत अनेक वादळे पेलली आणि त्यातून मार्ग काढला. आताही ते यावर मात करतील असा विश्वास शिवसैनिकांना आहे.
कोकण आणि शिवसेना यांचे वेगळे नाते आहे. बाळासाहेबांपासून सुरू झालेले हे नाते उध्दव ठाकरे यांनी अधिक घट्ट केले. सिंधुदुर्गाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध योजनांसाठी निधी देण्याबरोबरच येथील पर्यावरण संवर्धनासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द कोकणवासीयांच्या नक्की लक्षात राहील.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80977 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..