
मनासारख्या आरक्षणासाठी इच्छुकांचे देव पाण्यात
मनासारख्या आरक्षणासाठी इच्छुकांचे देव पाण्यात
संगमेश्वर तालुका; पंचायत समितीबाबत उत्सुकता
देवरूख, ता. २६ः बांठिया आयोगाच्या अहवालाचा स्वीकार करत ओबीसी आरक्षणानुसार आगामी निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने आणि तातडीने निवडणुका जाहीर करण्याचे आदेशही दिल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीची आरक्षणे २८ जुलैला जाहीर होणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात गट आणि गणांची संख्या वाढल्याने या आरक्षणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यापूर्वी संगमेश्वर तालुक्यात ७ जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गण होते. नव्याने झालेल्या रचनेत तालुक्यात ८ गट आणि १६ गण झाले आहेत. ही रचना करताना यापूर्वीच्या गणांची रचना बदलली आहे. अनेक गावे इकडून तिकडे गेली आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. जिल्हा परिषदेचे आरक्षण रत्नागिरीत जाहीर होणार असून पंचायत समितीचे आरक्षण स्थानिक पातळीवरच जाहीर होणार आहे. सर्वसाधारणपणे यापूर्वी आरक्षणे पडताना आधी महिलांसाठी राखीव असलेले गण हे पुरुषांसाठी राखीव होत असत. या वेळी मात्र ही संख्याच वाढल्याने आता सर्वच गणात नव्याने आरक्षण पडणार आहे. मनासारखे आरक्षण पडावे यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. संगमेश्वर तालुका पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे.
१४ पैकी १३ सदस्य सेनेचे असून १ भाजपच्या तिकिटावर निवडून आलेला आहे. मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. तालुक्यात यापूर्वी सेनेपाठोपाठ भाजपची ताकद होती; मात्र हक्काचा आमदार निवडून आल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादीने जोर धरला आहे. गावागावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमात आहेत त्यामुळे शिवसेनेसमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. राज्यात निर्माण झालेली महाविकास आघाडी अजून तशीच असली तरी तिचा उपयोग स्थानिक पातळीवर होताना कठीण आहे. त्यामुळे इथे सर्वच पक्ष आपापले बळ आजमावणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, काँग्रेस असे सर्वच पक्ष रिंगणात असणार आहेत. जाहीर झालेल्या गट आणि गणानुसार बहुसंख्य पक्षातील इच्छुकांनी आपली दावेदारी सांगण्यास सुरवात केली आहे; मात्र यासाठी आरक्षण पडणे गरजेचे आहे.
कोट
यावेळी तालुक्यात २ गण वाढल्याने आणि गावांची अदलाबदल झाल्याने आम्हाला आरक्षणाची उत्सुकता आहे. या आरक्षणा नंतरच आम्ही आमची रणनीती ठरवणार आहोत त्यामुळे याकडे आमचे बारकाईने लक्ष असेल
- प्रमोद अधटराव
तालुकाध्यक्ष, भाजप, संगमेश्वर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80995 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..