
वागदेत दारु वाहतुकीचा पर्दाफाश
38793
वागदे ः येथे मंगळवारी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या संशयितांना वाहनांसह ताब्यात घेतले.
वागदेत दारू वाहतुकीचा पर्दाफाश
२३ लाखांचा ऐवज जप्त; नगरमधील तिघांविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः गोव्याहून नगर जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर आज राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली विभागाने वागदे येथे कारवाई केली. त्यात तब्बल १० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो व पायलट मोटार अशी दोन वाहने मिळून एकूण २३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नगर येथील तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई आज सकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गोव्याहून नगर जिल्ह्यात दारू वाहतूक होणार असल्याची माहिती कणकवलीच्या भरारी पथकाला मिळाली होती. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रभात सावंत यांनी मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे सापळा रचला. सकाळी सातच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या एका टेम्पोला (एमएच २३ डब्ल्यू २१ ८५) थांबण्यात आले. तपासणीत गोवा बनावटीच्या दारूचे एकूण १०० बॉक्स आढळले. या दारूची सरासरी किंमत १० लाख २९ हजार ६०० रुपये एवढी होती. पथकाने गाडीसह चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, पायलट म्हणून वापरण्यात आलेली मोटारही (एमएच १२ केजी ८८०४) जप्त केली. याप्रकरणी रवींद्र दत्तू कापसे (वय २७, रा. हळगाव), देवीदास अंबादास डोके (३२ रा. भूतवाडा) आणि अजित लालासाहेब उबाळे (३२, रा. जोडी, सर्व जि. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही वाहनांची किंमत आणि गोवा बनावटीची दारू मिळवून एकूण २३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक एस. टी. पाटील, दुय्यम निरीक्षक जे. एस. मानेमोड, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एस. चौधरी, एस. एस. कुवेसकर, वाहनचालक जगन चव्हाण, खान व शाह आदींचा सहभाग होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81114 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..