सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

sakal_logo
By

38810
देवगड-जामसंडे नगरपंचायत

सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

देवगड नगरपंचायत सभा; घंटागाडी, थकलेल्या बीलांवरुन वाद

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः देवगड-जामसंडे शहरातील घंटागाडीच्या विषयावरून सत्ताधारी शिवसेनेला घेरण्याचा विरोधी बाकावरील भाजपकडून प्रयत्न होताच मागील काळातील थकलेल्या बीलांकडे सत्ताधाऱ्यांनी अंगुलीनिर्देश करीत विरोधकांनाच कोंडीत पकडले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक चकमकी झडल्या. यावेळी नोंदी नसलेली तसेच परस्पर खरेदी केलेली बीले प्रशासनाने अदा करून नयेत, असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला. दरम्यान, रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामावरूनही चर्चा रंगली.
येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात झाली. नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, नितीन बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते. आयत्यावेळच्या विषयात घंटागाडीचा विषय भाजप नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी मांडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावर काही घंटागाड्या नादुरूस्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी संबधित दुरूस्तीदाराचे मागील सुमारे ६० हजार रूपये देयक असल्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधून अशा थकलेल्या बीलांमुळेच नगरपंचायतीला सेवा मिळण्यात दिरंगाई होत असल्याची बाब मांडली. अन्य बाबतीतही बीलेही थकीत राहिल्याचा परिणाम कामांच्या सेवेवर होत असल्याची बाब सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून समोर आणली. यावेळी ग्रासकटरचाही विषय मांडला गेला. दरम्यान, विरोधकांकडून नगराध्यक्षांच्या मानधनाचा विषय मांडला जाताच चर्चा वाढत जावून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. अखेर नोंदी नसलेली देयके तसेच परस्पर खरेदी केलेली बीले अदा करू नयेत, असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला. पथदीप खांबाचा विषय नगरसेविका प्रणाली माने यांनी मांडला. यावर माहिती देताना पहिल्या टप्यातील बील अदा झाले आहे. मात्र, दुसऱ्या टप्यातील सुमारे २३ लाखापैकी दहा लाखाचे धावते देयक अदा केले. उर्वरित कामाची पडताळणी करून बील अदा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपंचायतीला कायमस्वरूपी अभियंता आणि लेखापाल असावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेली इमारत निर्लेखित झालेली असताना त्यामध्ये रास्तदराचे दुकान चालू असल्याकडे नितीन बांदेकर यांनी लक्ष वेधून यामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेस जबाबदार कोण? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. येथील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामाचा विषय सभागृहात चर्चिला गेला. बिलाची रक्कम मिळाली नसल्याची तसेच काही तांत्रिक बाबी संबधित कंत्राटदाराकडून समोर येताच काम नेमके कधी होणार? अशी विचारणा सत्ताधाऱ्यांनी केली.
...................
चौकट
सत्ताधारी नाराजी
प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याबाबत सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. काम कुठल्याही प्रभागातील असो, नागरिकांच्या चांगल्या सेवेसाठी प्रशासनाने गतीमान होण्याची अपेक्षा नितीन बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केली. तर शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्‍नावरून नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. प्रशासनाने जनतेच्या प्रश्‍नाचे गांभीर्य राखले पाहिजे, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81124 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top