
धबधब्यातून कोसळून तरूणाचा मृत्यू
38821 -
भुईबावडा ः घाटातील धबधब्याजवळ याच दरीत मंगळवारी तरुणाचा कोसळून मृत्यू झाला.
धबधब्यातून कोसळून तरुणाचा मृत्यू
भुईबावडा घाटातील घटना; मृत सांगलीचा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २६ ः भुईबावडा घाटातील धबधब्यातून कोसळून सांगली येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोहन यशवंत चव्हाण असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिस आणि सह्याद्री पथकामार्फत रात्री उशिरापर्यत सुरू होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः सांगली कापडपेठ येथील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंगसर येथील धनजंय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते. यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, उमेश सुतार, रमेश सुतार, प्रशांत बाडवणे, प्रकाश सुतार, धनजंय बेलवकर, उदय बेलवलकर आणि रोहन चव्हाण यांचा समावेश होता. सकाळी नऊच्या सुमारास सर्व सांगलीहून निघाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भुईबावडा घाटात आले. भुईबावडा घाटातील धबधबा पाहून त्यांना राहवले नाही. ते, धबधब्यामध्ये अंघोळ करण्यासाठी उतरले. याचवेळी घाट परिसरात जोरदार पाऊस झाला. धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे सर्वजण धबधब्यातून बाहेर आले. यावेळी इतर सहकाऱ्यांना रोहन कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी शोधण्यास सुरुवात केली. परंतु, कुठेच न दिसल्यामुळे त्यांनी गगनबावडा पोलिसांना ही माहिती दिली. गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना दरीत १०० फूट खोल दरीत रोहनचा मृतदेह आढळून आला. गगनबावडा पोलिसांनी वैभववाडी पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर तत्काळ पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, अभिजित तावडे, विलास राठोड, श्री. पडेलकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले; परंतु काळोख आणि खोल दरी यामुळे त्यांनी करुळ येथील सह्याद्री रेस्क्यू पथकाला पाचारण केले. रात्री आठच्या सुमारास पथक भुईबावडा घाटात पोहोचले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
चौकट
मोरीच्या पाईपातून
घसरल्याची शक्यता
धबधब्याचे पाणी दरीत जाण्यासाठी रस्त्याला मोरी बांधण्यात आली आहे. धबधब्याचे कोसळणारे पाणी याच मोरीतून दरीत कोसळते. पावसामुळे मोरीचे पाईप निसरडे झालेले असतात. याच मोरीतूनच रोहन चव्हाण हा दरीत कोसळला असावा, अशी शक्यता आहे.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81135 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..