संवादाला नसतो भाषेचा अडसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवादाला नसतो भाषेचा अडसर
संवादाला नसतो भाषेचा अडसर

संवादाला नसतो भाषेचा अडसर

sakal_logo
By

38872
बांदा ः केंद्रशाळेत कॅलिफोर्निया येथील लुकस मार्टिन याने भेट दिली.
38873
बांदा ः पोषण आहाराचा आस्वाद घेताना लुकस.

संवादाला नसतो भाषेचा अडसर

परदेशी पाहुणे बांद्यात भेटीला; कॅलिफोर्नियाच्या लुकसशी मुलांच्या गप्पा

नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः संवादासाठी भाषा ही अडसर ठरू शकत नाही. आपल्या देहबोलीतून दोन भिन्न संस्कृतीच्या व्यक्तीही एकमेकांशी तेवढ्याच प्रभावीपणे भाषेच्या पलीकडेही मैत्री करू शकतात. आपले आयुष्य कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे इंग्रजी संस्कृतीत व्यतीत केलेल्या लुकस मार्टिन याने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मराठी माध्यमाच्या मुलांशी तब्बल तीन तास मनमोकळा संवाद साधत या मुलांना आपलेसे केले.
संवाद व मैत्रीला भाषेच्या माध्यमाची गरज नसते, हे दाखवून देत लुकसने सर्वच मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण केले. दुपारी मुलांसमवेत त्याने शाळेतील पोषण आहाराचा देखील आस्वाद घेतला. यावेळी त्याला मुलांनी रोजच्या बोलीभाषेतील काही मराठी शब्दही शिकविले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर यांच्या माध्यमातून ‘परदेशी पाहुणे मुलांच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कॅलिफोर्निया येथील लुकस मार्टिन याने पुणे येथील मराठमोळी तरुणी मुक्ता पाटील हिच्याशी विवाह केला. वाफोली येथे राहून या जोडप्याला सेंद्रिय शेती करायची आहे. तसेच नवनवीन प्रकल्प उभारून येथील तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यायचे आहे. लुकसला शाळा तसेच लहान मुलांविषयी विशेष प्रेम आहे.
बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पटसंख्येत तसेच नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. लुकसने प्रथमच एका मराठी माध्यम शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतला. सकाळी शाळेत येताच त्याचे मुलांनी स्वागतगीताने व स्वनिर्मित पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पारंपरिक स्वागताने लूक भारावून गेला. त्याने शाळेविषयी प्राथमिक माहिती जाणून घेतली व पहिली ते सातवीतील सर्व १४ वर्गातील मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्येक वर्गात त्याचे मुलांनी जोरदार स्वागत केले. सुरुवातीला त्याची पत्नी मुक्ता व शाळेच्या शिक्षिका शुभेच्छा सावंत यांनी दुभाषींचे काम केले; मात्र नंतर लुकसने मुलांशी जुळवून घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मुलांनी अमेरिका, तेथील संस्कृती, शाळा व्यवस्थापन, शिक्षण याविषयी जाणून घेतले.
शाळेतील प्रत्येक उपक्रमाची सविस्तर माहिती घेत भविष्यात शाळेतील मुलांसाठी काहीतरी करण्याचा मानस त्याने व्यक्त केला. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. ही शाळा गेली १६८ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत आहे, हे ऐकून लुकस भारावून गेला. केंद्रशाळेत त्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, जे. डी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी शैलेश गवस, ग्रामपंचायत सदस्या उमांगी मयेकर आदी उपस्थित होते. शाळेच्या मधल्या सुटीत मुलांना पोषण आहार देण्यात येतो. लुकसने मुलांसोबत आहाराचा आस्वाद घेत जेवणाच्या दर्जाचेही कौतुक केले. सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळेचे व्यवस्थापन सुनियोजित करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे कौतुक करायलाही तो विसरला नाही. जाता जाता त्याने ‘तुम्हा सगळ्यांना भेटून आनंद झाला, मी पुन्हा येईन’ असे अस्खलित मराठी बोलत सर्वांचा निरोप घेतला.
..................
चौकट
मराठीसाठी पुन्हा येईन..!
लुकसने यावेळी मराठी भाषेविषयी प्रेम व्यक्त केले. या भाषेत गोडवा असून मनातील भाव, प्रेम व्यक्त करण्यासाठी मराठी ही सर्वोत्तम भाषा असल्याचे त्याने सांगितले. वाफोलीत राहताना रोजच्या दिनक्रमात येणारे मराठी व मालवणी बोलीभाषेतील शब्द त्याला हळूहळू ज्ञात होऊ लागले. मलाही मराठी भाषा शिकण्याची इच्छा असून या भाषेचे ज्ञान घेण्यासाठी आपण या शाळेत वेळोवेळी येऊ, असे त्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81239 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..